उरण : मागील आठवडाभरात आलेल्या शीतलहरीमुळे समुद्रातील तापमानातही घट होऊन वातावरणात बदल झाल्याने मासळीच्या प्रमाणात ४० टक्क्यांपेक्षा अधिकने कमी आल्याने आवक घटली आहे. त्यामुळे बाजारातील मासळीचे प्रमाणच कमी झाल्याने मासळीच्या दरात वाढ झाली आहे. तर मांसाहारी लोकांनी मासळीला पर्याय म्हणून चिकनचा पर्याय निवडला आहे. तर वातावरणात तापमान वाढल्यास पुन्हा एकदा मासळीची आवक वाढण्याची आपेक्षा मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.

उरण तालुका हा समुद्रकिनाऱ्यावर असल्याने येथील नागरिकांचप्रमुख अन्न हे मासळी आहे. मात्र सध्या थंडीचा हंगाम सुरू झाला असून तापमानात घट झाल्याने गारवा निर्माण झाला आहे. याचा परिणाम मासेमारी व्यवसायावरही झाला आहे.

मासळी व्यवसाय हा वातावरणातील बदलांवर अवलंबून असल्याने अनेकदा बदललेल्या वातावरणामुळे मासेमारांना मासळी दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागतो. पावसाळय़ात पावसामुळे तसेच जिवाला धोका असल्याने मासेमारी बंद असते, तर थंडीच्या काळात गारठा निर्माण झाल्यास त्याचाही परिणाम मासेमारीवर होतो. अशाच प्रकारचे वातावरण उरण परिसरात तयार झाल्याने थंडगार वातावरणामुळे मासळीची आवक ४० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात घटली असल्याची माहिती करंजा येथील मच्छीमारांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथील नागरिक जीवन पाटील म्हणाले की, बुधवार असल्याने मी मासळी खरेदीसाठी आलो होतो, मात्र मासळीचे दर अधिक असल्याने मी मासळीऐवजी चिकन घेणे पसंत केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.