करंजातील शेवंडी सिंगापूरच्या पंचतारांकित हॉटेलांत

प्रदूषण आणि अपरिमित मासेमारी यामुळे मच्छीमारांना मत्स्यदुष्काळाचा सामना करावा लागत असताना, करंजा व रेवस येथील मच्छीमारांना  नगदी फायदा देणाऱ्या शेवंडय़ा व खेकडय़ांनी (चिंबोऱ्या) तारले आहे. शेवंडी ही कोळंबीसारखीच असून तिला परदेशात मोठी मागणी आहे. हे मासे बाजारात १२०० रुपये किलोने विकले जात आहेत.

समुद्रातील मोठय़ा खेकडय़ांचीही निर्यात होत आहे. ही मासळी मुंबईतील निर्यातदारांकडे पाठवली जाते. तिथून ती सिंगापूर आणि अन्य काही देशांतील पंचतारांकित हॉटेलांत पुरवली जाते, अशी माहिती खरेदीदारांनी दिली.

उरणमधील मच्छीमार १०० किलोपेक्षा अधिक शेवंडी व खेकडय़ांची विक्री करत आहेत. जास्तीत जास्त नफा कमावण्यासाठी मच्छीमारांनी शेवंडी पकडण्यास प्राधान्य दिले आहे. नवी मुंबईच्या अनेक गावांतून खेकडय़ांची निर्यात केली जाते. त्यासाठी उत्तम प्रतीचे निवडक खेकडे खरेदी केले जातात. स्थानिक ग्राहकांना ते विकले जात नाहीत.

उरणमधील करंजा, मोरा तसेच अलिबागमधील रेवस बंदरावर शेवंडय़ांची खरेदी केली जाते. त्यानंतर त्यांची परदेशात निर्यात केली जाते, अशी माहिती हा व्यवसाय करणारे देविदास कोळी यांनी दिली. हा व्यवसाय आपण गेली १०-१२ वर्षे करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. शेवंडी हा चविष्ट मासा असून त्याचा रस्सा केला जातो. पंचतारांकित हॉटेलांत या पदार्थाला मोठी मागणी असते.

शेवंडी या मासळीचा व्यवहार बंदरावरच होतो. तिची विक्री केली की पैसेही ताबडतोब मिळतात. आम्ही हीच मासळी पकडण्याचे काम करतो.

निशांत कोळी, मच्छीमार