वीज खांब उभारले, मात्र दोन वर्षांपासून दिवे न लावल्याने संताप

पनवेल : २८० कोटी खर्च करून भव्य प्रशासकीय भवन उभारण्यासाठी पुढाकार घेतलेल्या पालिका प्रशासनाने चार वर्षांत पदपथांवर मात्र प्रकाश पाडता आला नाही. दोन वर्षांपूर्वी २ हजार ८०० पथदिवे उभारण्यात आले आहेत. मात्र त्याला दिवे लावता न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पनवेल पालिका क्षेत्रात सुमारे चार हजार पथदिवे उभारणे अपेक्षित आहे. त्यापैकी २८०० दिव्यांसाठी महापालिकेच्या वीज विभागाने शासनाची एलईडी दिवे लावण्याची योजना राबविण्याचे ठरविले. जुन्या नगर परिषदेच्या क्षेत्रातील सर्व जुने दिवे बदलून नवीन एलईडी दिवे लावण्याचे काम हाती घेतले. त्यामध्ये पालिकेमधील ३ हजार २०० एलईडी दिवे बदलण्यात आले. तसेच त्याच कंत्राटदाराला २८०० पथदिव्यांचे दिवे पुरविण्याचे काम दिले. मात्र दरम्यानच्याकाळात पुरवठादाराची सेवा व्यवस्थित नसल्याने पालिकेने हे काम त्यांच्याकडून काढून घेतले.

त्यानंतर कमी दराने निविदा काढण्यात आल्या. मात्र दोन वेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी उभारलेल्या पुलांवर अद्यापही पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत. २८०० वीजखांबांसाठी ९ कोटी २० लाख आणि दिव्यांसाठी ३ कोटी २७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

या प्रश्नाबाबत खारघर विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष बळीराम नेटके यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे पनवेलचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, नेटके आणि पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे शहर अभियंता विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेतली.

विजेच्या खांबांवर लवकरच दिवे लागणार आहेत. दिवे खरेदीसाठी यापूर्वी दोन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. तांत्रिक अडचणीमुळे हे काम रखडले आहे. याबाबत प्रशासकीय मान्यतेनंतर निविदा प्रक्रिया लवकरच अंतिम टप्प्यात येईल. त्यानंतर तातडीने दिवे लावण्यात येतील.

संजय जगताप, शहर अभियंता, पनवेल पालिका

रोडपालीत १६० पैकी  ९ पथदिवे सुरू ; रात्री व पहाटे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय

पनवेल : अगोदरच पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था होत खड्डे पडले आहेत. त्यात पथदिवे बंद असल्याने रोडपाली येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. येथील १६० पैकी फक्त ९ पथदिवे सुरू असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी सिडकोला याबाबत लेखी निवेदन दिले असून समस्या दूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

रोडपाली वसाहतीमध्ये सेक्टर १५ ते २० हा परिसर येतो. सुमारे ५० लाख रुपये देऊन नागरिकांनी येथील सदनिका खरेदी केल्या आहेत. मात्र रस्तेच चालण्यासाठी शिल्लक नसल्याची त्यांची व्यथा असून अंधार असल्याने चाचपडत चालावे लागत आहे.

येथील शिवसेनेचे शहर

संघटक संभाजी चव्हाण यांनी नागरिकांचा हा प्रश्न गरुवारी सिडकोकडे मांडला. येत्या नवरात्रोत्सवापूर्वी हे रस्ते दुरुस्ती आणि पथदिवे प्रकाशमय न झाल्यास शिवसेना आंदोलन करेल, असा इशारा सेनेचे पदाधिकारी डी. एन. मिश्रा, महेश गुरव, सुर्यकांत म्हसकर, अक्षय साळुंके, संभाजी चव्हाण यांनी दिला आहे.