सांगलीतील ६७ मुलांवर मोफत उपचार
घरात अठराविशे दारिद्रय़, शेतावर मजुरी करून संसाराचा गाडा हाकण्याचा प्रयत्न, नवजात अपत्याला हृदयाचा त्रास, त्याच्यावरील उपचारांमुळे होते नव्हते ते पैसे संपलेले, पंचक्रोशीतील सर्व शासकीय डॉक्टरांकडे हेलपाटे मारून थकलेला जीव, शस्त्रक्रियेसाठी लागणारा अवाच्या सव्वा खर्च अशा संकटात सापडलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील गरीब शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या मदतीला नवी मुंबईतील डॉक्टर बहीणभाऊ धावून आले आहेत. नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. विजय पाटील व डॉ. प्रिया पाटील हे सांगली जिल्ह्य़ातील ६७ चिमुकल्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी जातीने लक्ष देत असून बुधवारपासून या लहानग्यांच्या शस्त्रक्रियांना सुरुवात झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अत्यल्प उत्पन्न गटातील गरीब गरजू रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी काही खासगी रुग्णालयांना आवाहन केले होते. त्यानुसार नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाने या आवाहनाला प्रतिसाद देऊन मोफत उपचारासाठी एक वेगळा कक्षच सुरू केला आहे. असा वेगळा कक्ष सुरू करणारे राज्यातील हे पहिलेच खासगी रुग्णालय आहे. त्याची मुख्यमंत्र्यांनी नुकतीच पाहणी केली. सांगली जिल्ह्य़ातील विविध गावे, वाडय़ा येथून आलेल्या ६७ रुग्णांनी नातेवाईकांसह या रुग्णालयात ठाण मांडले आहे. जिल्हाधिकारी शिखर गायकवाड यांनी त्यासाठी प्रयत्न केले असून या रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी सातत्याने संपर्क ठेवला होता. डी. वाय. पाटील रुग्णालयाने एक ते १५ वयोगटातील या चिमुकल्या रुग्णांसह सर्व नातेवाईकांची रुग्णालयातील सहाव्या मजल्यावर निवासासह खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. बहुतांशी ह्य़ा चिमुकल्यांना हृदयाचे आजार असून बुधवारी अभिजित लांडगे आणि श्रद्धा मोहिते या मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी डॉ. पाटील भाऊबहिणीसह डॉ. डी. जी. राणे, डॉ. शंतनू देशपांडे, डॉ. विजय अग्रवाल, डॉ. सोमनाथ मल्लिकावीर या डॉक्टरसह २५ परिचारिकांचा चमू कार्यरत आहे. या शस्त्रक्रिया पुढील दोन महिने चालणार असल्याचे रुग्णालयाचे उपवैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम मोरे यांनी सांगितले. यापूर्वी ह्य़ा रुग्णालयाच्या वतीने अनेक मोफत वैद्यकीय सेवा दिल्या जात असून सुमारे दोन हजार बाह्य़रुग्णावर दररोज उपचार केले जात आहेत. ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांना दिलेला हा मदतीचा हात अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद व इतर खासगी रुग्णालयांना प्रेरणा देणारा आहे.
चार महिन्यांचा असताना अभिजितला हृदयाचा त्रास जाणवू लागला. मिरज, सांगली, कोल्हापूर, कराड, विटा येथील सर्व शासकीय रुग्णालयात त्याला उपचारासाठी नेण्यात आले. एक तर दोन वेळा खाण्याची भ्रांत, त्यात सर्व खर्च अभिजितच्या उपचारावर होत होते. एका खासगी डॉक्टरने तर एक लाख २० हजार रुपयांचा खर्च सांगितला. शेवटी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. येथील डॉक्टर आमच्यासाठी देवच आहेत.
-संजय लांडगे, वाणगी, सांगली, (अभिजितचे वडील)
श्रद्धा आता सात वर्षांची आहे. तिला हा आजार असल्याचे समजल्यावर आमच्या पायाखालची वाळूच सरकली होती. तिच्या उपचारासाठी अनेक प्रयत्न केले, पण यश आले नाही. येथे आल्यावर एक प्रकारचा विश्वास निर्माण झाल्यासारखा वाटत आहे. श्रद्धाने खूप शिकावे, असे आम्हाला वाटते.
-सुनील मोहिते, सांगली, श्रद्धाचे काका