* वाचनालय व ज्येष्ठांसाठी आसनव्यवस्थेचीही सुविधा
*फ्रेन्डर्स सर्कलचा सामाजिक उपक्रम

उरण शहरातील कोटनाक्यावरील फ्रेन्डस सर्कल नवरात्रौत्सव मंडळाने मासळी मार्केट शेजारील भागात मोफत ‘वायफाय’ची सुविधा उपलब्ध ‘करून दिली आहे. त्याचबरोबर वाचनालय व ज्येष्ठांसाठी आसनव्यवस्थाही केली आहे. वायफायची व्याप्ती ३० मीटर परिघाची असून त्यात वाढ करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
इंटरनेट सुविधा आज गरजेची झाली असून त्यामार्फत चालणाऱ्या समाजमाध्यमांना असलेला तरुणांचा प्रतिसाद पाहता त्या अंतर्गत वायफायची मोफत सुविधा मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होईल असा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे. उरण मासळी मार्केट शेजारी असलेल्या छोटय़ाशा जागेत येथील मंचावर सार्वजनिक कार्यक्रम व विवाहासारखे घरगुती सोहळेही होत होते. परंतु येथील घाणीचे साम्राज्य वाढल्याने अनेकजण कार्यक्रम घेणे टाळत गेले. याचा विचार करून फ्रेन्डस सर्कल मंडळाने पुढाकार घेत या परिसराचा कायापालट केला. मंचाची रंगरंगोटी करून लग्न समारंभासाठी एक खोली त्यांनी तयार केली आहे. सार्वजनिक वाचनालयासह येथे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसनव्यवस्थाही केली आहे.
१९८६ साली कोटनाका येथील तरुणांनी एकत्रित येऊन फ्रेन्डस सर्कल नवरात्रौत्सव मंडळाची स्थापना केली आहे. मंडळाकडून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात, अशी माहिती मंडळाचे संस्थापक सदस्य व सल्लागार नरेश रहाळकर यांनी दिली आहे. आतापर्यंत कित्येक गरजू व होतकरू मुलांना शिक्षणासाठी तर पूर व दुष्काळग्रस्तांनाही मंडळाने मदत केली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष कुंदन नारायण भोईर व सचिव मिलिंद भोईर यांनी सांगितले.