महापौर निवडणूक आणि त्यानंतर या महिन्यात होणाऱ्या सभागृह नेता नियुक्तीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील स्पर्धकांची नावे प्रसिद्ध करून नवी मुंबईतील प्रसारमाध्यमे आग लावायचे धंदे करीत असल्याची आगपाखड माजी मंत्री गणेश नाईक यांनी नुकत्याच झालेल्या पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात केली आहे. त्याचबरोबर आगामी पालिका निवडणुकीत पक्षाचे ८० नगरसेवक निवडून येतील तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील, असे भाकीत देखील त्यांनी केले आहे.
मागील महिन्यात झालेल्या महापौर निवडणुकीत काँग्रेसच्या पांठिब्यावर पालिकेत महापौर बसविणे राष्ट्रवादीला शक्य झाले आहे. या निवडणुकीपूर्वी पक्षात इच्छुक असलेल्या नगरसेवकांची नावे प्रसारमाध्यमांकडून प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावेळी माध्यमांच्या या आततायीपणावर टीका करण्याचे नाईक यांनी टाळली होते. मात्र महापौरपदाची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवारी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांवर आगपाखड केली. महापौरपदाचा उमेदवार कोण, अथवा भावी सभागृह नेता कोण असेल, हे ठरविण्याचा अधिकार सत्ताधारी पक्षाचा सल्लागार म्हणून माझे आहे. त्यामुळे नाव जाहीर करण्याअगोदरच संभाव्य स्पर्धकांची नावे जाहीर करून प्रसारमाध्यमे आगीत तेल ओतण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी प्रसारमाध्यमांवर केला.
यावेळी मागील अडीच वर्षांत पालिकेत एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला नसल्याचाही साक्षात्कार नाईक यांनी बोलून दाखवला. तसेच काही कार्यकर्त्यांचा वरचा मजला रिकामा असून त्यांना पैशाची मस्ती चढली आहे. त्यांना माझे भाषण हे प्रवचन वाटत असून तशी माझ्यामागे माझी निंदानालस्ती ते करीत आहेत. कार्यकर्त्यांना कधीही हिंसा, कोणाचे वाईट करण्याचे मार्गदर्शन आपण कधी केले नाही, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. त्याचबरोबर येत्या दोन वर्षांत लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता वर्तविताना त्यानंतर होणाऱ्या पालिका निवडणुकीत ८० नगरसेवक हे राष्ट्रवादीचे असतील, असे भाकीत देखील त्यांनी व्यक्त केले.
यावेळी तीन वर्षांपूर्वी आलेल्या मोदी लाटेपुढे स्थिरावलेली पालिका म्हणून नवी मुंबईचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.
प्रसारमाध्यमांचा आततायीपणा यापूर्वीही
२० वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्या पालिका निवडणुकीत महापौरपदासाठी इच्छुक उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात नाईक यांचे दिवगंत बंधू तुकाराम नाईक आणि ज्येष्ठ सहकारी बुधाजी भोईर यांच्या नावांचा समावेश होता. त्यावेळी या सर्वाना टाळून नाईक यांनी आपले ज्येष्ठ चिरंजीव संजीव नाईक यांना महापौर पदाची माळ घातली. त्यामुळे हे सहकारी नंतर नाराज झाल्याने त्यांनी नाईक यांना रामराम ठोकला. तेव्हापासून स्पर्धकांची नावे अगोदरच जाहीर करणाऱ्या प्रसारमाध्यमांवर नाईक यांचा रोष आहे.