वृत्तवाहिनी व सदस्यांविरोधात मानहानीचा दावा करणार
वाशी येथील गणेश टॉवर इमारतीमध्ये हुक्का पार्लर, मद्यपान आदी अनैतिक धंदे होत असल्याची बातमी एका वृत्तवाहिनीवर झळकली होती. मात्र ही बातमी खोडसाळ असून त्यात तथ्य नसल्याचा खुलासा गणेश टॉवरमधील नागरिकांनी पत्रकार परिषदेत बुधवारी केला. ही बातमी देणाऱ्या सोसायटीच्या सदस्याविरोधात आणि वृत्तवाहिनीविरोधात प्रत्येकी १० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा करणार असल्याची माहिती सोसायटी सल्लागार तथा माजी उपमहापौर भरत नखाते व सोसायटी सदस्यांनी दिली.
वाशी सेक्टर १ येथे १५ मजली गणेश टॉवर इमारत आहे. या इमारतीमध्येच माजी उपमहापौर भरत नखाते यांचे वास्तव्य असून त्यांची येथील सदस्यांवर दहशत असल्यामुळे त्यांचा मुलगा सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये हुक्का पार्लर चालवतो, तसेच तेथे तो मित्रांसह मद्याच्या पाटर्य़ा करतो, काहीवेळा कॉल गर्लनाही आणतो, यामुळे या इमारतीत अनैतिक धंद्यांना ऊत आल्याची बातमी एका वृत्तवाहिनीवर चित्रफितीसह प्रसारित करण्यात आली होती. ही चित्रफीत समाजमाध्यमांवरही प्रसारित झाली आहे. दरम्यान गेल्या आठ महिन्यांपासून या सोसायटीचे क्लब हाऊस बंद असून तिथे कोणत्याही प्रकारचे अनैतिक धंदे होत नाहीत. सदर ठिकाणी फक्त मुलांना खेळण्यासाठी कॅरम आणि बुद्धिबळ खेळाचे साहित्य ठेवण्यात आले आहे, असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. सोसायटीचे अध्यक्ष वसंत रेपाळ यांनी पदाचा गैरवापर करत सोसायटीचे सदस्य मनोज माने, बी. के.भोईर यांच्याशी संगनमत करून सोसायटीच्या सीसीटीव्हीच्या चित्रफिती वृत्तवाहिनीला पुरवल्या, मात्र त्यात सोसायटीमधील मुली नवरात्रीत दांडिया रास खेळून परतत असल्याचे आढळून येत आहे. या मुली या कॉल गर्ल असल्याचे वृत्तवाहिनीच्या बातमीत भासवण्यात आल्यामुळे या मुलींची आणि सोसायटीची नाहक बदनामी झाली आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला. सोसायटीची बदनामी करणाऱ्या सदस्यांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात १३० सदस्यांच्या सहीने तक्रार नोंदवण्यात आली आहे, तसेच सोसायटीतील चार मुलींनी वैयक्तिक तक्रार दाखल केली आहे.
सोसायटी सदस्य मनोज माने यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.