गणेशोत्सवात ‘गणा धाव रे, मला पाव रे’ हे प्रसिद्ध गीत असलेला कोकणातील लोकप्रिय बाल्या नाच भल्याभल्यांना थिरकायला लावतो. उरणमध्ये गणेशोत्सवानंतर गौरा गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची मोठी परंपरा आहे. या गौरा उत्सवाला बाल्या नाचाच्या स्पर्धा भरवून शक्ती व तुरेवाले अशा दोन संघांमध्ये नाच-गाण्यांच्या स्पर्धा भरविण्याची तब्बल ७४ वर्षांची परंपरा खोपटे गावात पाटील पाडय़ातील शिवकृपा गौरा मंडळाने जपली आहे. या उत्सवातील बाल्या नाचाच्या स्पर्धा पाहण्यासाठी रायगड जिल्ह्य़ातील नागरिक मोठय़ा संख्येने गर्दी करतात. विशेष म्हणजे गौरा मंडळाचे स्वत:चे मंदिर असलेले हे एकमेव मंडळ असून या मंडळातर्फे दरवर्षी विसर्जनाच्या वेळी बाल्या नाचाचे जंगी सामने भरविले जातात. गौरीच्या आगमानाच्या दिवशी येणारा हा गौरा गणपती पाच दिवसांचा असतो.
‘गणा धाव रे, मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाऊ रे, तू दर्शन आम्हाला दाव रे’ हे गाणे तर या नाचासाठी प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या नाचाकडे गणेशोत्सवातील करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जात होते. मात्र सध्या यात बदल झाला आहे. या नाचातही आता स्पर्धा आली आहे. या स्पर्धेसाठी दोन संघ असतात. यापैकी एक शक्तीवाले तर दुसरा संघ तुरेवाले म्हणून नृत्यकला सादर करतात. त्याचप्रमाणे पूर्वीच्या बाल्या नाचासाठी पारंपरिक गीतांवरच नाच केला जात होता, तर आता सध्याच्या हिंदी किंवा मराठी चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यांच्या चालीचा आधार घेऊन कवने रचून गाणी म्हटली जात आहेत.
या गाण्याच्या ध्वनीमुद्रिका (कॅसेटही) तयार करून त्याची विक्री केली जात असून स्पर्धेसाठी विविध नाच मंडळे तयार करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे या नाचातील नेहमीचा पोशाख असलेली अर्धी पँट आणि गळ्यातील रूमाल हा पोशाख जाऊन फूल पँट आणि रंगीबेरंगी पोशाखाने त्याची जागा घेतलेली आहे. या स्पर्धेत सद्य:स्थितीचा आढावा घेणारी व जनजागृती करणारी शीघ्रगीते कवींकडून रचली जाऊन ती सादर केली जातात.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Sep 2015 रोजी प्रकाशित
गणा धाव रे, मला पाव रे..
गणेशोत्सवात ‘गणा धाव रे, मला पाव रे’ हे प्रसिद्ध गीत असलेला कोकणातील लोकप्रिय बाल्या नाच भल्याभल्यांना थिरकायला लावतो.
Written by रोहित धामणस्कर
First published on: 23-09-2015 at 07:21 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh utsav in uran