सिडकोकडून ग्रामपंचायतींना कचराप्रक्रियेसाठी भूखंडवाटप
वाढत्या औद्योगिकीकरणात आणि शहरीकरणात उरणमधील गावांतील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती सिडकोच्या विकास क्षेत्रात मोडतात, त्यांना घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी भूखंड द्यावेत, अशी मागणी उरण पंचायत समितीकडून करण्यात आली होती. त्यानुसार सिडकोने धुतूम, पागोटे, कुंडेगाव, नवघर, नवघरपाडा, भेंडखळ, डोंगरी, फुंडे, पाणजे, बोकडविरा, नागाव, म्हातवली व केगाव या ग्रामपंचायतींना भूखंड मंजूर केल्याची माहिती पंचायत समितीने दिली. त्यामुळे उरणमधील १३ ग्रामपंचायती कचरामुक्तीच्या वाटेवर आहेत.
ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या झपाटय़ाने वाढली आहे. त्यामुळे येथील घनकचऱ्याची समस्याही गंभीर झाली आहे. ग्रामपंचायत हद्दीत कचराभूमी नसल्याने रस्त्याच्या कडेला, गटारात, तसेच इतरत्र कचरा टाकला जात आहे. स्वच्छता अभियान राबविण्यात आले असले तरी त्याचा फायदा झालेला नाही. प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्याचा निर्धार पंचायत समितीने केला. त्यासाठी लागणाऱ्या भूखंडाची मागणी सिडकोकडे करण्यात आली होती. त्यानुसार सिडकोकडून ग्रामपंचायतींना भूखंड देण्याचे मान्य केल्याची माहिती उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय. एम. प्रभे यांनी दिली. यात धुतूम, पागोटे, कुंडेगाव यांच्यासाठी द्रोणागिरीतील सेक्टर दोनमधील भूखंड क्रमांक ३१, नवघर, नवघरपाडा व भेंडखळला सेक्टर १२ मधील गार्डन भूखंड, डोंगरी, फुंडे, पाणजेसाठी सेक्टर २७ मधील ८८ क्रमांकाचा भूखंड, सिडको वसाहतीसाठी सेक्टर ३०, सिडको वसाहत बोकडविरा या गावांसाठी सेक्टर ५१चा भूखंड, नागाव, म्हातवली, केगाव सव्र्हे क्रमांक १२१, १२२- २ असे भूखंड आरक्षित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
