लग्नाचा तगादा लावल्याने तिचा ससेमिरा बंद करण्यासाठी प्रेयसीचा गळा दाबून तिला ठार करणाऱ्या आरोपीस नवी मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. कुठलाही पुरावा नसताना गुन्हा नोंद झाल्यावर ४८ तासांच्या आत गुन्हे उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.राजकुमार बइ बूराम पाल असे यातील आरोपीचे नाव आहे तर सायदा बानु हासमी असे मयत महिलेचे नाव आहे. राजकुमार हा मानखुर्द येथे एका गृहनिर्माण संस्थेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो तर सायरा हि स्वच्छता कर्मचारी म्हणून महाराष्ट्र नगर येथे काम करते. १२ फेब्रुवारीला कोपरखैरणे खाडी किनारी असलेल्या एका रस्त्याच्या कडेला महिलेचा मृतदेह आढळून आला होता. हि माहिती मिळताच कोपरखैरणे पोलीस पथक घटना स्थळी रवाना झाले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील वैद्यकीय तपासणी साठी प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल केला. दरम्यान मृत महिलेच्या गळ्यावर असलेल्या खुणेवरून तिला गळा दाबून मारल्याचा संशय पोलिसांना आला व त्या अनुशांघाने तपास सुरु करण्यात आला. सुरवातीला तिची ओळख पटणे गरजेचे असल्याने मृतदेहाचे फोटो सर्व पोलीस ठाण्यांना धाडण्यात आले. ट्रॉम्बे पोलीस ठाणे येथे तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार आढळून आली.
हेही वाचा >>>नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील कापड कारखान्याला भीषण आग, कामगार आत अडकल्याची भीती
बेपत्ता महिला आणि मयत महिलेत साम्य असल्याचे दिसून आले. याची शहानिशा करण्याकरीता यातील फिर्यादी मोहम्मद अकिल फकीर मोहमंद हाशमी याच्याकडे मयत महिलेचा फोटो दाखवून चौकशी केली असती त्यांची पत्नी असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच तिचे नाव सायदा बानु हासमी असल्याची माहितीही त्यांनी दिल्याने मयताची ओळख पटली . पुढील चौकशी दरम्यान सदरची महिला ही जुईनगर येथे हाउस किपिंगचे काम करीत होती.पोलिसांनी मयत महिलेचा मोबाईल मिळवला त्या अनुषंगाने गुन्हयात जलद गतीने तपासाचे तक फिरवून तांत्रिक तपास करून काही संशयीतांचे मोबाईल क्रमांक मिळवले गेले.
राजकुमार बबूराम पाल असल्याचा कयास पोलिसांनी काढला व त्याला ताब्यात घेतले.पाल हा कौसीका सोसायटी मध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करतो त्याच्याकडे गुन्हयातील मयत महिला तसेच गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने मयत महिला सायदा बाजु हासमी हिने लग्नाचा तगादा लावल्याने तिचा ससेमिरा टाळण्यासाठी हत्या केल्याची कबुली दिली. तिला काहीशी निर्जन जागा असलेल्या कोपरखैरणे खाडी किनारी बोलावून तिचा गळा ओढणीने आवळून हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे.अशी माहिती गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे यांनी दिली. या तपास कामी गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रताप देसाई, पोलीस हवालदार अतिश कदम पोलीस हवालदार सतीश सरफरे, महेश पाटील अनिल यादव यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.