scorecardresearch

‘जेएनपीटी’ची ऐतिहासिक कामगिरी ; २०२१-२२ आर्थिक वर्षांमध्ये विक्रमी माल हाताळणी

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) हे भारतातील प्रमुख कंटेनर बंदर असून जेएनपीएने २०२१-२२ या आर्थिक वर्षांमध्ये ५.६८ दशलक्ष टीईयू माल हाताळणी केली आहे,

उरण : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) हे भारतातील प्रमुख कंटेनर बंदर असून जेएनपीएने २०२१-२२ या आर्थिक वर्षांमध्ये ५.६८ दशलक्ष टीईयू माल हाताळणी केली आहे, जी २०२०-२१ मधील ४.६८ दशलक्ष टीईयूच्या तुलनेत २१.५५ टक्के अधिक आहे. जेएनपीएची ही आजवरची कोणत्याही आर्थिक वर्षांतील सर्वाधिक कामगिरी आहे.
जेएनपीएने २०१८-१९ मध्ये ५.१३ टीईयूची सर्वाधिक हाताळणी केली होती. आर्थिक वर्ष २०२१-२२ दरम्यान जेएनपीएमध्ये एकूण ७६ दशलक्ष टन वाहतूक हाताळणी झाली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील ६४.८१ दशलक्ष टनांच्या तुलनेत १७.२६ जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जेएनपीएमध्ये हाताळलेल्या एकूण कंटेनर वाहतुकीपैकी बीएमसीटीने १२ लाख ४४ हजार ६९४ टीईयू; एनएसआयजीटीने ११ लाख ८६ हजार १८१ टीईयू; एपीएमटीने १८ लाख ६५ हजार ५८७ टीईयू; एनएसआयसीटीने ९ लाख ४७ हजार ८८७ टीईयू व जेएनपीसीटीने ४ लाख ४० हजार २१० टीईयू हाताळणी केली.
आर्थिक वर्ष २०२१-२२ दरम्यान जेएनपीएने मागील वर्षीच्या ६,०९२ रेक आणि ९ लाख २१ हजार ५१२ टीईयूच्या तुलनेत ६,२७८ कंटेनर रेक आणि १० लाख ०७ हजार ६६७ टीईयूची हाताळणी केली. तसेच आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये एनएसआयजीटी आणि बीएमसीटीने अनुक्रमे १.१८६ दशलक्ष आणि १.२४५ दशलक्ष टीईयू हाताळून प्रथमच १ दशलक्ष टीईयूचा टप्पा ओलांडला, ज्यामुळे त्यांच्या कामगिरीमध्ये अनुक्रमे ५२.१२ टक्के आणि ३३.३९ टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली.
जेएनपीएच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, ‘आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जेएनपीएने केलेली ५.६८ दशलक्ष टीईयूची ऐतिहासिक कामगिरी ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही करत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आणि वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या कामगिरीसाठी आमच्या सर्व कर्मचारी व भागधारकांचे अभिनंदन. त्यांच्या बहुमूल्य योगदानाशिवाय ही कामगिरी करणे शक्य नव्हते. जेएनपीए देशाच्या आर्थिक विकासाचा मार्ग प्रशस्त व गतिमान करण्यासाठी वचनबद्ध आहे.’ जेएनपीएची ही ऐतिहासिक कामगिरी आयात-निर्यात व्यापार, सागरी व बंदर क्षेत्रातील जेएनपीएचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करते. जेएनपीए जागतिक दर्जाच्या सुविधा विकसित करून जागतिक व्यापार समुदायाच्या पहिल्या पसंतीचे बंदर बनविण्यासाठी प्रयत्नशील राहील.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Historic performance jnpt record handling 2021 22 financial years jawaharlal nehru port amy