दारावे

मूर्तिकार, नाटककार, भारुडकार, भजन गायक, बायांची गाणी अशी संस्कृती जपणाऱ्या कलाकारांचे गाव म्हणजे दारावे गाव. करावे आणि पारसिक टेकडीच्या मधोमध वसलेल्या या गावाला निर्सगसंपदा लाभलेली आहे. सध्याच्या सी वूड दारावे रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या गावाच्या पूर्वेला पारसिक टेकडी तर पश्चिमेला पीर मोहम्मद शाहाचा दर्गा आणि शेती, मिठागरे अशी भौगोलिक रचना आहे. इतर तीन दिशांनाही सर्वदूर पसरलेले मिठागरांचे आगार होते. आज तिथे टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. राज्यातील सर्वात मोठा मॉल सध्या याच गावाला लागून बांधण्यात आला आहे. कधी काळी संपूर्ण बेलापूर पट्टीतील ग्रामस्थांची करमणूक करणाऱ्या गावातील मूर्तीकला मात्र आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.

नेरुळ रेल्वे स्थानकानंतर करावे आणि दारावे अशी दोन गावे आहेत. दोन्ही गावांत आगरी लोकवस्ती असल्याने ही गावे जणू काही दोन जुळ्या भावांसारखी वाटतात. २५-३० कुटुंबाच्या या गावाची लोकसंख्या ६०-७० वर्षांपूर्वी ४०० पर्यंत होती. आता मात्र ती भरमसाट वाढून तीन हजारांपर्यंत गेली आहे. विनायक बाबुराव नाईक ऊर्फ मास्टर यांचे गाव म्हणूनदेखील हे गाव ओळखले जाते. मास्टर यांनी नवी मुंबईतील गावांत नाटक जिवंत ठेवण्याचे काम केले. त्यासाठी प्रत्येक गावातील तरुणांना एकत्र करणे, त्यांची तालीम घेणे आणि गावागावात जाऊन नाटकाचे प्रयोग करण्याचे काम मास्टर यांनी केले होते. त्यामुळे पंचक्रोशीत सणासुदीला दारावे गावात त्यांची नाटके सादर केली जात. नाटय़प्रेमाने झपाटलेल्या या दारावेकराने ही परंपरा जपली.

विनायक मास्टर नाटकांचे प्रयोग करत असताना भिकू नाईक यांनी भारुडाचे गारुड केले. त्यासाठी गणपत धर्मा पाटील यांची त्यांना साथ मिळत होती. सणासुदीला आगरी कोळी समाजात बायांची गाणी गाण्याची पद्धत आहे. बायांची गाणी म्हणजे देवीचे गाण्यातून केलेले गुणगान. या गाण्यांची रचना आणि गाणे ह्य़ा दोन्ही जबाबदाऱ्या पुंडलिक दामोदर नाईक यांनी लीलया पार पाडल्या.

इतर कला मात्र काळाच्या ओघात लोप पावल्या आहेत. शहरीकरणाचा कहर होण्यापूर्वी म्हणजेच १९९१ पर्यंत ‘हळदी समारंभ’ नावाच्या नाटकाचे प्रयोग या गावातील काही तरुण करत. त्यात हळदी सभारंभात होणारी पैशांची उधळपट्टी, बेसुमार मद्यपान, मांसाहारावर ताव यावर बोचरी टीका करण्यात आली होती. आज हळदी समारंभात पोलिसांवर हल्ले होत आहेत आणि इतरांना त्रास झाला तरी आम्ही उशिरापर्यंत डीजे वाजवणारच अशी भूमिका घेतली जात आहे. यावरून कोपरखैरणेतील गावकऱ्यांत दोन तट पडले आहेत, मात्र या नाटकातून त्या काळात आगरी-कोळी बांधवांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला होता.

म्हात्रे, भोईर, पाटील, नाईक ही आगरी समाजातील मंडळी या गावात शेती आणि मिठागरावरील मजुरी करून उदरभरण करत. गावात दोन गटांत कधी कधी हाणामारी होत असे, मात्र काही दिवसांत ते पुन्हा एकत्र येत.

१९७० नंतर गावाचा काही कायापालट होण्यास सुरुवात झाली. एमआयडीसी आणि सिडकोत गावातील बोटावर मोजण्याइतके ग्रामस्थ कामाला लागले. गावात शिक्षणाची व्यवस्था प्राथमिक शाळेपर्यंत होती, पण माध्यामिक किंवा उच्च माध्यमिक शाळेसाठी बेलापूर, तुर्भे किंवा ठाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. काशिनाथ पाटील हे गावातील पहिले पदवीधर असल्याचे सांगितले जाते. सत्तरच्या दशकातच गावात पाणी व वीज आली. गावाला राजकीय तसेच क्रीडा क्षेत्राची परंपरा नसली तरीही इथल्या कलाकारांबद्दल गावाला अभिमान आहे.

गावाच्या चारही बाजूंनी सिडकोने साडेबारा टक्के  योजनेतील भूखंडांचे लवकर वितरण केल्याने गावाचा विस्तार होण्यास वाव राहिला नाही. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी वाढवलेली काही मोजकी बांधकामे वगळता गावात बेकायदा बांधकामे नाहीत, असे ग्रामस्थ अभिमानाने सांगतात. या भागाचा विकास आराखडा लवकर तयार करण्यात आल्याने गावाच्या चारही बाजूंनी रस्ते, पाणी, वीज यांचा विकास झाला आहे. त्यामुळे नेरुळ किंवा बेलापूरसारख्या नोडप्रमाणे या गावाची रचना तयार झाली आहे. गावाच्या तीन बाजूने असलेल्या जंगलाची जागा आता सिमेंटच्या जंगलाने घेतली आहे. विविध पक्षी-प्राण्यांचे आवाज आणि लोककलांचे सूर अनुभवणाऱ्या या गावात आता रेल्वेचा आवाजही बेमालूमपणे मिसळला आहे.

नागनाथ मंदिर आणि चैत्रातील जत्रा

गावातील नागनाथ शिवमंदिरावर ग्रामस्थांची अपार श्रद्धा आहे. या मंदिराचा आता जीर्णोद्वार झाला आहे. मंदिर पांडवांनी बांधल्याचे गावकरी मानतात. तलावाचा एक भाग असलेल्या या मंदिराबरोबरच गावात गावदेवी, बामणदेव आणि येसुबाईची मंदिरे आहेत. चैत्र महिन्यात होणारी गावाची जत्रा आणि महाशिवरात्र हे गावातील उत्सव आजही मोठय़ा श्रद्धेने साजरे केले जातात.

मूर्तीकलेचे जतन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावात आजही जनार्दन धनाजी भोईर, रामनाथ अंबाजी नाईक, दिलीप अनंत भोईर आणि कृष्णा भोईर यांचे देवदेवतांच्या मूर्ती बनविण्याचे कारखाने आहेत. यात गणपती व देवीच्या मूर्ती बनविल्या जातात. कलेचा हा वसा नव्या पिढीनेही पुढे नेला आहे. कारखाने कायम राखले आहेत. आजही दारावे गावातील मूर्ती देश-विदेशात पाठविल्या जातात. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवासाठी येथील कारागीर वर्षभर राबतात. दारावे गावाची ही एक मोठी ओळख मानली जात आहे.