रविवारी अनेक दिवसांच्या लांबलेल्या मान्सूनचे आगमन उरणमध्ये झाले असून पावसाला सुरुवात होताच उरणसह, नवी मुंबई व मुंबईतील शेकडो पर्यटकांनी उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर मोठी गर्दी करून पावसाचे स्वागत केले. या वेळी उरण शहरातील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीलाही समोरे जावे लागले. या मान्सूनच्या आगमनासाठी तरुणाईने एकच जल्लोश करीत समुद्रात पोहण्याचा आनंद व्यक्त केला. त्यामुळे यापुढील सुट्टीचे दिवस व रविवारी उरणचा पिरवाडी बीच हाऊस फुल्ल होणार.
देशातील पर्यटनस्थळांपेक्षा परदेशी स्थळे पाहणाऱ्यांच्या संख्येत सध्या वाढ झालेली असताना उन्हाळी, पावसाळी व हिवाळी अशा तिन्ही ऋृतूंचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटन केले जाते. मात्र अनेकांना दूरवर जाऊन पर्यटनाचा आनंद लुटणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्याने जवळच एक-दोन तासांत पोहोचता येऊन पर्यटनाची मजा लुटता येईल अशा स्थळांच्या शोधात अनेक जण असतात. उरणला समुद्रकिनारा लाभला असून या किनाऱ्यावर पर्यटकांची संख्या तशी कमीच असते, मात्र मागील काही वर्षांत पर्यटनाची वाढती आवड यामुळे येथील पर्यटकांतही वाढ झालेली आहे. काही वर्षांपूर्वी एकटेदुकटे हॉटेल होते. यात वाढ होऊन सध्या उरणच्या किनाऱ्यावर तसेच आजूबाजूलाही खवय्यांची खवय्येगिरी भागविणाऱ्या शाकाहारी तसेच मांसाहारी हॉटेल्स उभारले गेले आहेत. त्यामुळे काही दिवस उत्तम राहण्याचीही सोय असणारे हॉटेल्स या परिसरात तयार होऊ लागले आहेत. उरणचा समुद्रकिनारा स्वच्छ असून येथील वाळूचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे कोकण आणि रायगड जिल्ह्य़ातील प्रसिद्ध नसला तरी उरणमधील स्थानिक रहिवासी तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच रायगड जिल्ह्य़ातील काही तालुक्यातून या समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या सध्या वाढू लागल्याची माहिती पिरवाडी येथील रहिवासी नाना पाटील यांनी दिली आहे. मांसाहारी आणि त्यातही आगरी पद्धतीचे जेवण उपलब्ध होत असल्याने आगरी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तसेच आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक मोठी गर्दी करीत आहेत.
जगदीश तांडेल