तीन बोटींद्वारे वाळूची वाहतूक

पनवेल : करोनामुळे प्रशासन व्यस्त असल्याचा फायदा घेत पारगाव येथील एका टोळीने खारघरच्या खाडीपात्रात वाळू उपसा सुरू केला आहे. तीन बोटींच्या माध्यमातून प्रशासन पोहचू शकत नाही अशा कांदळवनाच्या बेटांमध्ये मोठे खड्डे करून उपसा केला जात आहे.

पनवेलच्या तहसीलदारांनी गेल्या महिन्यात रोडपाली खाडीपात्रात कारवाई केली होती.

पनवेल तालुक्यामध्ये करोनामुळे १२४३ जणांचा मृत्यू झाला असून दररोज मृत्यू होणाऱ्यांची संख्या १० पेक्षा अधिक आहे. हा मृत्यूदर कसा कमी करता येईल तसेच तिसऱ्या लाटेसाठी उपाययोजना उभारण्यात प्रशासन गुंतले आहे. याचा फायदा घेत पारगाव येथे खारघर खाडीपात्रात बेकायदा वाळू उपसा होत आहे. तीन बोटी यासाठी वाघिवली येथून दररोज खारघर पात्रात येतात आणि तेथून वाळू उपसा करून ते बोटीनेच पुन्हा वाघिवली येथे घेऊन जातात. यापूर्वी खारघर पात्रातून उपसा केलेल्या वाळूची वाहतूक रोडपाली उड्डाणपुलापर्यंत करणारा रस्ता नुकताच तहसीलदार विजय तळेकर यांनी उद्ध्वस्त केल्याने माफियांनी ही नवी युक्ती लढवली आहे. खारघर ते वाघिवली असा जलवाहतूक केली जात आहे.

यापूर्वी खारघर खाडीपात्रात अनेक बाझ सुरू होते. स्थानिक पोलीस, महसूल व तटरक्षक दलाच्या माध्यमांतून या बेकायदा व्यवसायावर कारवाई न झाल्यास खारघर खाडीपात्रासह शहराला पुराचा धोका निर्माण होईल असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

पनवेल तालुक्यात यापूर्वी महसूल विभागाने पुढाकार घेत बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या १५ बोटींवर कारवाई केली आहे. हजारो ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे. ही कारवाई सुरूच असते. यात सागरी पोलीस आणि मेरीटाइम बोर्ड यांची साथ मिळाल्यास निसर्गाचे रक्षण करण्याच्या कामाला अधिक गती देता येईल. तसेच सर्व विभागांनी सरसकट कारवाई केल्यास बोटी शिरूच शकणार नाहीत.

– विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल</strong>