पुढील १५ दिवस धोक्याचे; अचानक रुग्ण वाढण्याची भीती

नवी मुंबई : गणेशोत्सव काळात ५० पर्यंत स्थिर असलेल्या करोना रुग्णसंख्येत गेल्या तीन चार दिवसांपासून वाढ होत आहे. मंगळवारी ६० तर बुधवारी ७९ रुग्ण सपाडले आहेत. त्यामुळे रुग्णवाढीचा धोका टळलेला नसून पुढील १५ दिवसांत हे चित्र स्पष्ट होणार आहे.

 राज्य शासनाने दिलेल्या निर्बंध शिथिलतेनंतर व सणासुदीच्या खरेदीला झालेल्या गर्दीनंतरच्या आठवडाभरानंतरही करोनाच्या नव्या रुग्णांची संख्या स्थिरावली असल्याचे चित्र होते. परंतु आता सणासुदीनंतर करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याचे चित्र आहे. दुसरीकडे उपचार घेणाऱ्या उपचाराधीन रुग्णांची संख्याही ५५० च्या आत आली होती. ती संख्या सहाशेच्या जवळपास येऊन पोहचली आहे. पालिका प्रशासनाने

अचानक रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत पालिका प्रशासनाने व्यक्त केले आहे.

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता असताना आता शहरात करोबाधित दर व उपचाराधीन रुग्णसंख्याही हळूहळू वाढू लागली आहे. महापालिकेने चाचण्यांची संख्या मात्र कायम ठेवली असून रुग्ण सापडताच त्या ठिकाणच्या सोसायटीतील सर्व सदस्यांची चाचणी करण्यात येत आहे.

गणेशोत्सव पूर्वकाळात ५० पर्यंत शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर होती. त्यात या काळात झालेली गर्दी पाहता वाढ होत आहे. ही वाढ मोठी नाही. मात्र दरदिवशी रुग्णवाढ काही प्रमाणात का होईना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. १६ ऑगस्टला ६२ रुग्ण होते तर २२ ऑगस्टला ही संख्या ७९ पर्यंत गेली आहे.

लसीकरण केंद्रांत वाढ

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईला  मिळत असलेला लसपुरवठा अधिक आहे. तसेच महापालिका प्रशासनाने दिवसाला ५० हजार लस देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर लस मिळाल्यास अडचण नको म्हणून पालिका प्रशासनाने लसीकरण केंद्रांत वाढ केली आहे. शंभपर्यंत असलेली लसीकरण केंद्रे आता १२० पर्यंत केली आहेत.

महिनाभरात १,६६,८१० लसमात्रा

नवी मुंबई महापालिकेला महिनाभरात महिनाभरात १,६६,८१० लसमात्रा मिळाल्या. त्यामुळे मोफत लसीकरणाला शहरात गती मिळाली आहे.

करोना नवे रुग्ण वाढत आहेत. आठवडय़ाचा करोनाबाधित दर हा सरासरी ५१ रुग्ण होता. ते आता ६२ रुग्णांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे या वाढीकडे पालिका प्रशासन अत्यंत बारकाईने लक्ष ठेऊन आहे. शहरासाठी पुढील १५ दिवस अधिक धोक्याचे आहेत. या दिवसात रुग्णवाढ कशी होते आहे हे महत्त्वाचे असून त्यावरच तिसऱ्या लाटेबाबत अंदाज बांधता येणार आहे.

अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका