कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था, सीवूड्स्
सीवूड्स येथील कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था अनेक वर्षांपासून परिसरात साहित्य संस्कृतीचा प्रसार करत आहे. सीवूड्सच्या झपाटय़ाने झालेल्या विकासाची ही संस्था साक्षीदार आहे. ग्रंथसंपदा उपलब्ध करून देणे, विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवणे, बालकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे अशा अनेक मार्गानी कुसुमाग्रज वाचनालयाने परिसरातील नागरिकांना समृद्ध केले आहे.
समाजप्रबोधन, साहित्य, संस्कृती व कलेच्या उपासनेबरोबरच बालसंस्कार करणारी सीवूड्समधील संस्था म्हणजे कवी कुसुमाग्रज वाचनालय. सीवूड्सचा विकास झपाटय़ाने झाला. या विकासाची साक्षीदार असलेली शहरातील प्रत्येक नागरिकाला आपलीशी वाटणारी संस्था म्हणजे ‘मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ’, वाशी! याच संस्थेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या ललित पाठक यांनी सीवूड्समध्ये स्थायिक झाल्यानंतर तिथेही साहित्य संस्कृतीच्या प्रसाराचे कार्य वेगाने सुरू केले. महादेव देवळे, विजय दाते व कला व साहित्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांच्या साहाय्याने २००८मध्ये दिवाळी अंक योजना सुरू करण्यात आली.
अशोक कुंभार यांच्या हस्ते साहित्य संस्कृती मंडळाच्या वर्धापनदिनी ८ मे २००९ रोजी वाशीतील प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालयाची पहिली शाखा सीवूड्समध्ये सुरू करण्यात आली. जवळपास ५०० पुस्तके व २५ देणगीदारांपासून सुरू केलेल्या या वाचनालयाचा हळूहळू विस्तार झाला. नेहमीप्रमाणे सिडकोने जागेसाठी नकारघंटा वाजवली. वाचनालय शाखा म्हणून चालवल्यास अनुदान फक्त ८ हजार रुपये मिळते. त्यामुळे वेगळी संस्था काढण्याचा विचार सुरू झाला. त्यानंतर २०११ मध्ये कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सुरू करण्यात आली. रीतसर धर्मादाय नोंदणी करण्यात आली. मान्यता आणि अनुदानासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथ संचालनालयात पाठपुरावा करण्यात आला. परंतु सरकारने नव्या वाचनालयास मान्यता देणे बंद केल्याचे सांगण्यात आले. ३२ आश्रयदाते व २१० आजीव सभासद असलेल्या या वाचनालयात आज सहा हजारांहून अधिक पुस्तके आहेत. तर किमान २ हजार पुस्तकांची नोंदणी होत आहे. प्रौढ वर्गणीदार ४५०हून अधिक असून ८० पेक्षा अधिक बाल वाचक वाचनालयाशी जोडले गेले आहेत.
साहित्य, संस्कृती, टिकवतानाच आजच्या पिढीला आवश्यक आहेत ते चांगले संस्कार. त्यासाठी संस्थेने बालसंस्कार वर्ग सुरू केले आहेत. त्यात अनेक बालकांवर संस्काराचे पैलू पाडले जातात. संस्थेच्या पल्लवी देशपांडे, प्रज्ञा लळींगकर, मधुरा करमरकर, शीतल देशपांडे या बालसंस्काराचे वर्ग चालवतात. संस्थेच्या आजीव सभासद असलेल्या सूचल जाधव यांच्या घरी हे वर्ग चालवले जातात.
कुसुमाग्रज वाचनालय फक्त पुस्तकांची देवाणघेवाण करण्याचे ठिकाण नसून विभागातील नागरिकांचे सेवाकेंद्र बनले आहे. वाचनालयाच्या वतीने ७५ बालकलाकारांना घेऊन बालगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. बालकांच्या गायनातील सहजतेचे अनेकांनी कौतुक केले. अभिनेत्री शीतल क्षीरसागर या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. सुप्रसिद्ध डॉ. प. वि. वर्तक यांचे व्याख्यान, श्रीधर फडके यांचे गीत रामायण, अशोक नायगावकरांचे काव्यवाचन, शरद पोंक्षे यांचे स्वा. सावरकर यांच्यावरील व्याख्यान, जयवंत पाटील यांचे शिवचरित्र, अप्पा ठाकूर, शिल्पा देशपांडेसह अनेकांच्या गझलांचा कार्यक्रम, कलामंच, मृणालिनी साठेंचे शहरी शेतीवरील मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांतून विभागातील साहित्य, कलाप्रेमींवर वाचनालयाने गारूड केले आहे.
वाचनालयाच्या सहकार्याने आपल्या संस्कृती जतनासाठी नववर्ष स्वागतयात्रा तसेच कुसुमाग्रज कट्टा सुरू करण्यात आला आहे. वाचनालयाच्या सभासदांचे लेझीम पथकही आहे. एकीकडे वाचनालय विविध साहित्य व कलांना प्रोत्साहन देत असताना ग्राहक संघ सुरू करण्यात आला आहे. त्याला विभागातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. १२० ग्राहक या ग्राहक संघाचा लाभ घेत आहेत.
एकंदरीत कवी कुसुमाग्रज वाचनालय संस्था ही विभागातील नागरिकांत साहित्य, संस्कृतीचा प्रसार करत आहे. बालसंस्कार व समाजप्रबोधनाचे बीज रोवत आहे. त्यांचे हे कार्य अनेक वर्षांपासून सुरू आहे, त्यामुळेच हे वाचनालय सभासदांसह परिसरातील रहिवाशांच्या प्रेम जिव्हाळ्याचा भाग बनला आहे. वाचनालयाकडे आकर्षित होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले.
लोककलांवर व्याख्याने
इतिहास अभ्यासक जयवंत पाटील यांनी दसऱ्यापासून भारुड व ओव्या या विषयांसह विविध विषयांवर व्याख्यानांचा उपक्रम हाती घेतला आहे. परिसरातून या व्याख्यानांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. संस्थेच्या वतीने गतवर्षांपासून एक वक्ता एक स्थळ या संकल्पनेअंतर्गत व २० विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
डॉक्टर आपल्या दारी
संस्थेने आरोग्यवाहिनीअंतर्गत डॉक्टर आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत डॉ. स्वाती शेणाई, अस्मिता देशमुख, डॉ. संजीव कळकेकर, कविता वैद्य यांची व्याख्याने झाली आहेत. त्यांचा लाभ नागरिकांना मिळत आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ असणारे प्रवीण पाटील हे वाचनालयाचे अध्यक्ष असून महादेव देवळे उपाध्यक्ष आहेत.