समाजमाध्यमांचा अतिरेकी वापर कसा अडचणीत आणू शकतो, याचा प्रत्यय कामोठे वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका सुशिक्षित तरुणीला आला आहे. समाज माध्यमावर झालेल्या मैत्रीचा या मुलीला सध्या मनस्ताप होत असून त्यातून सुटका करून घेण्यासाठी तिने पोलिसांकडे धाव घेतली आहे.
कामोठेमध्ये राहणारी ही तरुणी एमबीए आहे. समाज माध्यमावर तिची स्वप्निल सोनावणे याच्याशी ओळख झाली. कोपरखैरणे येथे राहणारा स्वप्नीलही एमबीए आहे. आर्कूटच्या ओळखीनंतर त्यांच्यात नाते जुळले. या मैत्रीनंतर स्वप्निल तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करू लागला. यावर तिने ठाम नकार दिल्याने तिचे लग्न इतरत्र होऊ नये यासाठी तो खटाटोप करू लागला. मलेशिया येथील एका तरुणासोबत या तरुणीचा विवाह ठरला होता. मात्र स्वप्निलने या तरुणीची आक्षेपार्ह छायाचित्रे त्या तरुणाच्या मोबाइलवर पाठवल्याने त्यांचे लग्न मोडले. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या या तरुणीने कामोठे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी स्वप्निलविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.