रायगड जिल्ह्य़ातील अनेक तालुक्यांत शेतकरी, कष्टकरी वर्गाला गावातील प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची १२८ वी जयंती मोठय़ा उत्साहात उरणमधील विद्यालयातून मंगळवारी साजरी करण्यात आली. उरण तालुक्यात कर्मवीरांनी स्वत: येऊन करंजा, फुंडे, पिरकोन या गावांत तसेच पनवेल तालुक्यातील अनेक गावांत रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून माध्यमिक शिक्षणासाठी विद्यालये सुरू केली. त्यामुळे येथील पुढच्या पिढय़ांना शिक्षण मिळू शकले.
शैक्षणिकदृष्टय़ा मागास असलेल्या रायगड जिल्ह्य़ातील अनेक तालुक्यात १ ली ते ७ पर्यंतच्याच शिक्षणाची व्यवस्था होती. त्यामुळे येथील अनेक विद्यार्थी माध्यमिक शिक्षणापासून वंचित होते. ज्यांच्याकडे पैसे होते ते शहरात जाऊन शिक्षण घेत होते. मात्र येथील ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, मिठागर कामगार आदींची मुले शिक्षणापासून वंचितच होती. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवारी भाऊराव पाटील यांनी येथील दिवंगत दि. बा. पाटील, तु. ह. वाजेकर यांच्या सहकार्याने खेडय़ापाडय़ात माध्यमिक शिक्षण देणाऱ्या विद्यालयांची स्थापना केली. यापैकी पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालय, उरणमधील फुंडे महाविद्यालय तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून सध्या हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यालयातून स्पर्धात्मक शिक्षण मिळू लागले आहे. त्यामुळे येथील कष्टकरी वर्ग शिक्षण घेऊ लागला आहे. कर्मवीरांच्या जयंतीनिमित्त उरणमधील विद्यालयातून मिरवणुका काढण्यात आल्या. यानिमित्त विविध विषयांवरील चर्चासत्रे, निबंध व वक्तृत्व स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले होते.