पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक

पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या व्यापाऱ्याच्या मुलीची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. घरकामावरून काढून टाकलेल्या नोकरानेच आपल्या साथीदार आणि पत्नीच्या मदतीने या मुलीचे अपहरण केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

शिवा रामबाबम भगत (३०) पिंकू तांडेल, लक्ष्मण आनंद भगत, कृष्णकुमार रामआशिष राम अशी आरापींची नावे आहेत. शिवा भगत हा सहा वर्षांपूर्वी डहाणूतील सचिन नहार या व्यापाऱ्याच्या बंगल्यात घरकामास होता. त्याला सचिन यांनी कामावरून काढून टाकले होते. मात्र, त्याच्याकडे बंगल्याच्या बनावट चाव्या होत्या. या चाव्यांद्वारे शिवा आणि त्याच्या साथीदारांनी बंगल्यात प्रवेश केला.

दिया या ११ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध देऊन बेशुध्द केले. तसेच बंगल्यातील मोबाईल आणि स्कूटर घेऊन दियाचे अपहरण केले.या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक शारदा राऊत यांच्या सुचनेनुसार पोलिसांनी सात पथके तयार करून पालघर नवली फाटका जवळच्या एका खोलीतून अपहरणकर्त्यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून दिया नहारला ताब्यात घेतले. पाच कोटींच्या खंडणीसाठी आरोपींनी दियाचे अपहरणाचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले.