scorecardresearch

उरणमधील औद्योगिक विभागात अंधाराचे साम्राज्य

उरणमध्ये सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी औद्योगिक विभागाची उभारणी करण्यात आली असून येथील नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही सिडकोची असतानाही येथील नागरी सुविधांमध्ये रस्त्यावरील वीज व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याने मागील अनेक दिवसांपासून या परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

नवघर उड्डाणपूल, नवघर ते खोपटे मार्ग तसेच करंजा महामार्गावर पथदिवे बंद; अपघातांचा धोका वाढला

उरण : उरणमध्ये सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी औद्योगिक विभागाची उभारणी करण्यात आली असून येथील नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही सिडकोची असतानाही येथील नागरी सुविधांमध्ये रस्त्यावरील वीज व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याने मागील अनेक दिवसांपासून या परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी या मार्गावरील प्रवाशांच्या अपघाताचा धोका वाढला आहे. सध्या याच मार्गाने उरणमध्ये ये-जा करणारी एनएमएमटी व एस.टी.ची सार्वजनिक वाहतूक होत आहे. त्यामुळे सिडकोने तातडीने या मार्गावरील पथदिवे सुरू करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

जेएनपीटी बंदरावर आधारित उद्योगातील गोदामांसाठी सिडकोकडून द्रोणागिरी औद्योगिक विभाग उभारला आहे. यामध्ये नवघर, भेंडखळ, पागोटे व धुतूम ते रांजणपाडा असा संपूर्ण परिसर मोडतो. या परिसरात गोदामात ये-जा करणारी हजारो वाहने प्रवास करतात. तसेच याच गोदामात काम करणारे कामगारही दिवसरात्र प्रवास करतात. येथील मार्गाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सिडकोची आहे. यामध्ये उरण-पनवेल मार्गाला लागून असलेला नवघर उड्डाणपूल, नवघर ते खोपटा पुलापर्यंतच्या मार्गावरील पथदिवे बंद आहेत. सिडकोकडून या मार्गावर पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र ते अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे आम्हाला या अंधारातूनच वाट काढावी लागत असल्याचे मत मनोहर भोईर यांनी व्यक्त केले आहे. या मार्गावर दररोज अनेक जड वाहने उभी केली जात असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.  अनेकदा दुचाकीस्वारांचा अपघात होऊन त्यामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच याच मार्गाने मुंबई-गोवा मार्ग, पेण, अलिबाग, येथील नवघर, भेंडखळ तसेच उरणच्या पूर्व विभागातील शेकडो नागरिक प्रवास करीत आहेत. त्यामुळे उरण तालुक्यातील बहुसंख्य नागरिक या मार्गाचा मोठय़ा प्रमाणावर वापर करीत असल्याने सिडकोने पथदिवे सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kingdom darkness industrial division ysh

ताज्या बातम्या