नवी मुंबई : साखर खरेदी प्रकरणी कोलकाता येथील व्यापाऱ्याची नवी मुंबईतील तिघांनी तब्बल ६० लाख ७१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी साखर विकत देणारे आणि अन्य दोन एजंट विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दीपक कुमार , गौरव मक्कर ( दोन्ही एजंट) साजिद साखर विक्रेता असे आरोपींची नावे आहेत. यातील फिर्यादी उत्तमकुमार बोस हे असून ते कोलकाता येथे राहतात. उत्तमकुमार हे विदेशात साखर निर्यात करत असतात. अशाच एका व्यवहारात त्यांचा परिचय गौरव मक्कर याच्याशी झाला होता. एप्रिल २०२३ च्या सुमारास मक्कर यांनी उत्तमकुमार यांच्या समोर १३५ टन साखर पाठवूयात तशी मागणी आहे असा प्रस्ताव ठेवला. मात्र एवढी साखर एकाच वेळी मिळणार कुठे असा प्रश्न समोर आल्याने मक्कर यांनी नवी मुंबईतील गुवें ट्रेडर्सचे साजिद यांचे नाव सुचवले.साजिद हे एवढी साखर पुरवू शकतात असे सांगितले.

हेही वाचा…नवी मुंबई : पाणथळ जागा बिल्डरांच्या घशात…. पालिकेची फ्लेमिंगो सिटीची ओळख बेगडी !

सर्व बोलणी करून हा व्यवहार ठरला. त्यानुसार मक्कर यांनी उत्तमकुमार यांनी मक्कर यांच्या खात्यात ३७ लाख ८१ हजार ५०० रुपये वळवले. मात्र मक्कर यांनी सर्व रक्कम साजिद यांना २५ लाख ९१ हजार ५०० रुपये दिले तर ११ लाख ९० हजार उत्तमकुमार यांना परत केले. या ११ लाख ९० हजार बाबत पुन्हा स्पष्ट करू असे सांगण्यात आले. दरम्यान व्यवहार पुढे सरकण्यासाठी उत्तमकुमार यांनी ३४ लक्ष ४० हजार रुपये साजिद यांना दिले. तर अन्य मध्यस्थी दीपक कुमार यानेही ४० हजार फिर्यादी उत्तमकुमार यांच्या कडून कमिशन पोटी घेतले. 

हेही वाचा…नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन

अशा प्रकारे फिर्यादीने या व्यवहारात तिघांना मिळून ६० लाख ७१ हजार ५०० रुपये दिले.  हा पूर्ण व्यवहार १० मे ते ६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान झाला आहे. मात्र अद्याप पर्यंत उत्तमकुमार यांनी मागणी केल्या प्रमाणे १३५ टन पैकी एक किलोही साखर पुरवण्यात आली नाही. त्यामुळे अखेर उत्तमकुमार यांनी एनआरआय पोलीस ठाण्याला फसवणूक बाबत अर्ज दिला होता. या अर्जाची पूर्ण शहानिशा करून गुरुवारी एनआयआय पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.