नवी मुंबई : तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात असताना नवी मुंबईत मात्र करोनाबाबत आशादायी चित्र आहे. गेले दोन महिने दैनंदिन रुग्णसंख्या ५० च्या आत असून त्यातही आता घट होत आहे. मंगळवारच्या करोना अहवालात पहिल्यांदाच शहरातील वाशी व कौपरखरणे विभागात एकही नवा रुग्ण आढळला नाही.

नवी मुंबईत २३ मार्च २०१९ मध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर सातत्याने रुग्णवाढ होत गेली. यात श्हरातील काही भाग अतिसंक्रमित होते. त्यात कोपरखरणे व वाशी या दोन विभागांचाही समावेश होता.

पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण आढळून येणाऱ्या विभागात कोपरखैरणे अव्वल स्थानी होते. करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतरही या विभागात रुग्णसंख्या शून्य झाली नव्हती. मात्र मंगळवारी आलेल्या करोना अहवालात पहिल्यांदाच या दोन विभागांत एकही करोना रुग्ण आढळला नाही. मंगळवारी शहरात ४४ करोना रुग्ण आढळले. दिघा १, ऐरोली ३, घणसोली ४, तुर्भे ५, नेरुळ २१ आणि बेलापूर १० असे रुग्ण आढळले. मात्र कोपरखरणे व वाशी या दोन विभागांत शून्य रुग्ण होते.

करोना काळात पहिल्यांदाच एकही रुग्ण न आढळल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र याचा अर्थ रुग्ण सापडणार नाहीत असा नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊनच राहिले पाहिजे. अन्यथा परत रुग्णवाढ होऊ शकते, असा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

आज ५३ नवे रुग्ण

नवी मुंबईत बुधवारी करोनाचे ५३ नवे रुग्ण सापडले. यात ऐरोलीमध्ये सर्वाधिक १२ रुग्ण सापडले आहेत. नेरुळमध्ये ११ बेलापूरमध्ये १० रुग्ण आहेत. दिघ्यामध्ये मात्र एकही रुग्ण सापडला नाही. वाशी, तुर्भे, कोपरखरणे,घणसोलीत रुग्णसंख्या घटत असून ती  स्थिर आहे.

करोना स्थिती

१,०८,०२३ एकूण करोनाबाधित

१,०५,५८५ एकूण करोनामुक्त

१,९४५ एकूण मृत्यू

४९३ उपचाराधीन रुग्ण

सर्वाधिक करोना रुग्ण असणाऱ्या विभागात वाशी, कोपरखैरणे होता. मंगळवारच्या अहवालानुसार २३ मार्च २०१९ पासून पहिल्यांदाच या दोन विभागांत शून्य रुग्णसंख्या आहे. मात्र नागरिकांनी बेसावध न राहता  काळजी घ्यावी.

-प्रमोद पाटील, आरोग्य अधिकारी,महापालिका