नवी मुंबई : गटारी अमावास्यानिमित्त नवी मुंबईतील मांस व मासळी बाजारात बुधवारी (२३ जुलै) ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. श्रावण सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा बुधवार असल्याने पारंपरिक पद्धतीने गटारी साजरी करण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही मासळीच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली असली, तरीही खवय्यांनी खरेदी करताना आपला हात आखडता घेतल्याचे आढळले नाही.

वाशी, ऐरोली, तुर्भे आणि नेरुळ भागातील मच्छी मार्केटमध्ये पापलेट, सुरमई, कोलंबी, रावस, हलवा या लोकप्रिय मासळींना विशेष मागणी पाहायला मिळाली. विशेषतः बेलापूर येथील दिवाळे मासळी बाजारात ग्राहकांनी मोठी गर्दी करत आपल्या आवडत्या मासळीची खरेदी केली.

प्रकारदर (प्रति किलो)
सुरमई २००० रुपये
पापलेट १५०० रुपये
हलवा १००० रुपये
कोलंबी ८०० रुपये
बोंबील ७०० रुपये
रावस १००० रुपये

गटारी अमावस्या का साजरी केली जाते?

गटारी किंवा गतहारी अमावास्या ही श्रावण महिन्यापूर्वी येणारी अमावस्या असून ती चार्तुमासाच्या आरंभाची पूर्वतयारी मानली जाते. काही ठिकाणी या अमावस्येला आषाढ किंवा आखाड अमावस्याही म्हणतात. चार्तुमास म्हणजे पुढील चार महिने धार्मिकदृष्ट्या संयम, सात्त्विकता आणि उपासनेसाठी महत्त्वाचे मानले जातात. या काळात मांसाहार, मद्यपान, लग्नसमारंभ अशा गोष्टींना मर्यादा असते. त्यामुळे गटारी हा दिवस “श्रावणापूर्वीचा शेवटचा मांसाहार करण्याचा आणि जल्लोषाचा दिवस” म्हणून अनेकांकडून साजरा केला जातो.

गावाकडील भागात पारंपरिक पद्धतीने मित्रपरिवार, वाड्यातील मंडळी एकत्र येऊन जेवणावळींचे आयोजन करत असतात. शहरी भागात याचे रूपांतर आता पार्ट्यांमध्ये, सामूहिक जेवणावळीत आणि काही वेळा राजकीय संधी म्हणूनही होताना दिसते.

अशीच संधी साधून गटारीच्या निमित्ताने नवी मुंबईतील उबाठा सेनेच्या एका माजी नगरसेवकाकडून आपल्या प्रभागातील नागरिकांना तब्बल अडीच हजार किलो चिकनचे मोफत वाटप करण्यात आले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील मतदारांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगली असून, “गेल्या अनेक वर्षांपासून गटारी निमित्त सामाजिक उपक्रम राबवण्याची परंपरा आम्ही जपतोय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा स्थानिक नागरिकांसाठी हा छोटासा आनंद देण्याचा प्रयत्न आहे.” असे उबाठा गटाचे माजी नगरसेवक विशाल ससाणे यांनी सांगितले. यासाठी जुईनगर आणि नेरुळ विभागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असली तरी नागरिकांनी आधार कार्ड दाखवल्यावरच हे चिकन वाटप करण्यात येत होते. पालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना इच्छुक उमेदवारांकडून अशा प्रकारच्या कृती होत असल्याचेही काही नागरिकांकडून बोलले गेले. तर, सध्याच्या महागाईच्या काळात अशा स्वरूपाचे सहकार्य दिलासा देणारे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. एकूणच, गटारीनिमित्त मासळीच्या बाजारांमध्ये चैतन्य संचारले असतानाच, राजकीय हालचालींनीही जोर पकडला असल्याचे या निमित्ताने दिसून आले.