नवी मुंबई : शहरात झोपडपट्टी भागातही वाचन संस्कृती वाढावी यासाठी नवी मुंबई महापालिकेने ‘‘झोपडपट्टी तिथे ग्रंथालय’’ या अभिनव उपक्रमाची घोषणा केली असून आता तो उपक्रम प्रत्यक्षात उतरणार आहे. प्रशासनाने पहिल्या टप्प्यात झोपडपट्टय़ांत १० ग्रंथालये उभारण्याचे नियोजन केले असून महिनाभरात ती उभारण्यात येणार आहेत.
कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीत वाचनाचा मोठा वाटा असतो. वाचनामुळे जगाचे ज्ञान मिळते व व्यक्तिमत्त्वाचा सर्वागीण विकास होतो. त्यामुळे नवी मुंबईतील झोपडपट्टी भागातील नागरिकांना विशेषत्वाने मुले व युवकांना वाचनासाठी सहजपणे पुस्तके उपलब्ध व्हावीत व त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी वाढावी याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून ‘‘झोपडपट्टी तिथे ग्रंथालय’’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. याकरिता समाजविकास विभागामार्फत सर्वेक्षण करम्ण्यात आले आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात इंदिरानगर, हनुमान नगर, तुर्भे स्टोअर, गौतम नगर व पंचशीलनगर, कातकरीपाडा व भीमनगर, नोसिल नाका, रामनगर, इलठणपाडा, रमाबाई आंबेडकर नगर, शिवाजी नगर अशा १० झोपडपट्टी भागांमध्ये ग्रंथालयांसाठी जागा निश्चिती करण्यात आली आहे. याठिकाणी स्थापत्यविषयक कामे तसेच बाह्य व अंतर्गत रंगरंगोटीची कामे त्वरित करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. महिन्याभरात निश्चित केलेल्या दहा ठिकाणांवरील ग्रंथालये सुरू करण्यासाठी आवश्यक कामांच्या प्रक्रिया समांतरपणे राबवण्यात येणार आहे. झोपडपट्टी भागातील नागरिकांना वाचायला आवडतील अशी पुस्तके निवडली जाणार आहेत.
सुसज्ज ग्रंथालय
ग्रंथालयांमधील वातावरण वाचनासाठी प्रोत्साहित करेल अशाप्रकारचे आकर्षक असावे, जागेच्या आकारमानानुसार प्रत्येक ग्रंथालयाची अंतर्गत रचना व सजावट असावी, त्याठिकाणी ग्रंथालय व्यवस्थापनासाठी संगणक व पिंट्ररची व्यवस्था करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच ग्रंथालयाच्या जागांमध्ये स्वच्छ प्रसाधनगृहाची व्यवस्था असणार आहे.