दहावी बारावी नंतर पुढे काय करायचे, याचा विचार बहुतेक विद्यार्थी हे मिळालेल्या गुणांवर आणि मित्र कुठे प्रवेश घेणार आहे, यावर ठरवत असतात; मात्र त्यांचा हा गैरसमज असून परीक्षांच्या आधीच करिअर निश्चित करणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन करिअर समुपदेशक विवेक वेलवणकर यांनी दाहवी बारावीतील विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रमाची माहिती करुन देताना केले.

दहावी-बारावी नंतर प्रवेश घेताना निर्णय चुकला तर तो मागे घेता येत नाही. उत्तम अभियंता होण्यासाठी गणिताचा प्रभावी वापर, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, सहकार्याची भावना, जबाबदारीचे आत्मभान, चिकाटी, शोध-संशोधनवृत्ती, स्वयंप्रेरीत नियंत्रित स्वभाव, व्यवस्थापन कौशल्य हे गुण अंगी घेणे हल्लीच्या विद्यार्थ्यांना गरजेचे असल्याचे मत ‘व्हिजेटीआय’ महाविद्यालयाचे प्राध्यापक (निवृत्त) सुरेश नाखरे यांनी व्यक्त केले. वैद्यकीय क्षेत्राला आपले करिअर म्हणून न निवडता केवळ सेवाभावी वृत्ती, आवड, अविरत कष्ट करण्याची ताकद आणि समाजाचे काही देणे म्हणून हे क्षेत्र निवडल्यास आपण यशस्वी डॉक्टर होऊ शकाल, हा गुरुमंत्र विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना केईएम रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. अविनाश सुपे यांनी केले. मुलांवर विश्वास ठेवला तर ती यशस्वी होतील घरात भीतीदायकवातावरणामुळे मुलांच्या मनावर परिणाम होत असून काळजी भीती आणि रागामुळे मुलांमध्ये नकारात्मक भावना वाढीस लागण्याची शक्यता असते. घरातील वातावरण खेळीमेळीचे असणे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक आहे. मुलांशी संवाद वाढल्याने त्यांचा आत्मविश्वास नक्की वाढण्यास मदत होऊ शकते. योगा, व्यायम आणि पुरेशा झोप या माध्यमातून मनाचे चांगले आरोग्य राखता येते. मुलांना सकारात्मक गोष्टी सांगा, त्यांची तुलना इतरांशी करून त्यांचे खच्चीकरण करणे टाळा अशी सल्ला प्रा. मानसोपचारतत्ज्ञ हरीश शेट्टी यांनी दिला.
वाशी सेक्टर ७ येथील मराठी साहित्य संस्कृती कला मंडळाच्या सभागृहात शनिवारी ‘एसआरएम’ प्रस्तुत आणि रोबोटेक यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता-मार्ग यशाचा’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील करिअर वाटचालीबाबत योग्य दिशा दाखवण्याचे काम विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीच्या वतीने करण्यात आले. नवी मुंबईकर पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने सभागृह तुडुंब भरले होते.