माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शारीरिक दुखापतीच्या गुन्ह्य़ांच्या बरोबरीने राज्यात सायबर गुन्हे घडत असून या गुन्ह्य़ांची सोडवणूक करण्यासाठी केंद्रीभूत यंत्रणा निर्माण करण्याची योजना आखण्यात येत आहे. त्याकरिता नवी मुंबई येथे राज्याचे ‘सायबर गुन्हे प्रकटीकरण केंद्र’ (सायबर डिटेक्शन हब) तयार करण्यात येत असून इतर शहरातील सायबर शाखा (सेल) या केंद्राशी जोडलेल्या असतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

गृहमंत्र्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनिल देशमुख यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि पोलीस विभागातील उपक्रमांविषयी ‘लोकसत्ता’शी चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यात सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण खूप आहे. सायबर गुन्ह्य़ांची सोडवणूक करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पारंगत पोलिसांची आवश्यकता असते. याकरिता सायबर तज्ज्ञ पोलिसांचे मनुष्यबळ तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता नवी मुंबईत १ लाख चौरस फूट जागेवर ८०० ते ९०० कोटी रुपये खर्च करून राज्याची अद्ययावत ‘सायबर लॅब’ (सायबर गुन्हे प्रकटीकरण केंद्र) तयार करण्यात येत आहे.

अशाप्रकारचा पुढाकार घेणारा महाराष्ट्र देशात पहिला राज्य असून या केंद्राशी इतर शहरातील साबर शाखा जोडलेल्या असतील. या केंद्रामध्ये सायबर गुन्हे सोडवणुकीसाठी आवश्यक अद्ययावत तंत्रज्ञान व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती देशमुख यांनी यावेळी दिली.