उरण तालुक्यातील पाणजे व डोंगरी परिसरांतील मिठागरे व खाडी परिसरात फ्लेमिंगोसह इतर अनेक जातींचे पक्षी येऊ लागले असून या पक्ष्यांचे निरीक्षण तसेच पाहणी करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी पक्षीप्रेमी येतात. त्यात आता सुप्रसिद्ध मराठी सिने कलाकार मकरंद अनासपुरे यांचीही भर पडली आहे. रविवारी दुपारी अकरा ते साडेअकराच्या वेळेस त्यांनी आपल्या कुटुंबियांसह डोंगरी व पाणजे परिसरात येऊन येथे आलेले पक्षी पाहण्याचा आनंद आपल्या कुटुंबासह लुटला. त्यामुळे भविष्यात या परिसरात पक्षीप्रेमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तर सुट्टीच्या दिवशी पक्षी न्याहळण्यासाठी येणाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचीही मागणी होऊ लागली आहे.
मुंबईतील शिवडी व नवी मुंबईतील खाडी किनाऱ्यानंतर उरणमध्ये विविध जातींचे पक्षी येत आहेत. या पक्ष्यांसाठी असलेले पानथळे नष्ट होऊ लागले आहेत. असे असले तरी पक्ष्यांचे येणे सुरूच आहे. त्यातच सप्टेंबर महिन्यात हजारो मैलांचा प्रवास करीत येणारे यापैकी अनेक परदेशी पक्षी हे जून मध्ये परतीच्या मार्गावर लागतात. मात्र सध्या ही चक्र बदलून लागले आहे. त्यामुळे परतीऐवजी पक्ष्यांनी याच परिसरात कायमचा ठिकाणा केला आहे. या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी व त्यांचे पानथळे टिकून राहवेत याकरिता उरण तसेच मुंबईमधील पक्षीप्रेमी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. उरणमधील पाणजे व डोंगरी दरम्यान असलेल्या मिठागर परिसरात रविवारी मोठय़ा संख्येने फ्लेमिंगो आलेले होते. हे पक्षी पाहण्यासाठी मकरंद अनासपुरे हे आले होते. काही मिनिटांच्याच या भेटीत त्यांना व त्यांच्या कुटुंबियांनी पक्षी पाहून आनंद लुटला. याची माहिती मिळताच डोंगरी येथील युवकांनी अनासपुरे यांच्या सोबत सेल्फीही काढली.