विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी मातीच्या भराव टाकून खारफुटीवर अतिक्रमण केले जात असल्याचे चित्र आहे. विकासकामे करताना अनेकदा नियम धाब्यावर बसवले जात आहेत. खारफुटीवर भराव टाकून ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी खारफुटी नष्ट करून तिच्यावर अतिक्रमण होत असल्याने उरणच्या वनसंरक्षण विभागाने रात्री गस्त वाढवली आहे. तसेच या संदर्भात वनविभागाला अर्ज करून, दूरध्वनी वा प्रत्यक्षात भेटून माहीती दिल्यास कारवाई करण्याचे संकेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
खारफुटीचे संरक्षण व संवर्धन करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. खारफुटीमुळे जैवविविधतेचे रक्षण होते. त्यामुळे खारफुटी दिन साजरा करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खारफुटीच्या वृक्षाचे रोपणही करण्यात आले. असे असले तरी नवी मुंबईला लागूनच असलेल्या उरण मधील द्रोणागिरी नोड परिसरातील सिडकोच्या साडेबारा टक्के भूखंडावर विकासकांची इमारतींची कामे सुरू आहेत. अशा अनेक ठिकाणी खारफुटी असून या खारफुटीवर मातीचा भराव करून ती नष्ट केली जात आहेत. तसेच या परिसरातील अनेक ठिकाणच्या खारफुटीची झाडे पिवळी पडून करपू लागली आहेत. त्यामुळे खारफुटी नष्ट करण्यासाठी विशिष्ट सायनाचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच आग लावून खाफुटीची रोपे जाळण्याचाही प्रयत्न केला जात आहे. यावर खारफुटीची तोड होत असेल तर नागरीकांनी संपर्क साधून तक्रार केल्यास कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या संदर्भात खासगी विकासक आणि कंपन्यांवर खारफुटीच्या झाडांवर भराव करून ती नष्ट केल्याप्रकरणी महसूल वृक्षतोड अधिनियम १९६४ नुसार उरणच्या वन विभागाकडून गुन्हे दाखल केले आहेत. या संदर्भात उरण विभागाचे वनसंरक्षक बी.डी. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वन विभागाने खारफुटीवर मातीचा भराव केल्या प्रकरणी १९६४ च्या वृक्षतोड कायद्याच्या कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हे दाखल केले असल्याचे सांगितले. तर उरण व पनवेल विभागा हद्दीत एकूण पाच हजार हेक्टरचे वन क्षेत्र आहे. यावरील अतिक्रमण रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात कारवाई केली जाते, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.