संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई : इरशाळवाडीवर दरड कोसळल्याची बातमी इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वरोसे गावात पसरली. दरड कोसळल्यानंतर जीव मुठीत घेऊन खाली आलेल्यांकडून ही माहिती मिळाली होती. या गावातील अनेकांचे नातलग इरशाळवाडीत होते. त्यांना वाचविण्यासाठी आणि मदतीसाठी वरोसे गावातील अनेक तरुणांनी भर पावसात इरशाळवाडीकडे धाव घेतली. याच गावातील परशुराम निरगुडे यांनी आपल्या मेहुण्याला पाठीवर घेऊन त्याला गडाखाली आणले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इरशाळवाडीच्या सुरुवातीलाच परशुरामच्या सासऱ्यांचे घर असल्याने तिथे जाऊन परशुरामने मोठय़ा आवाजात मेहुण्याला हाका मारायला सुरवात केली. तेव्हा ढिगाऱ्याखालून ‘मला वाचवा, मला वाचवा’ असा आवाज येत होता. त्यामुळे परशुरामच्या बरोबर आलेल्या मित्रांनी मेहुणा प्रवीणच्या अंगावर पडलेली लाकडे तसेच मातीचा ढिगारा बाजूला करत त्याला बाहेर काढले. परशुरामने आपला मेहुणा प्रवीणला पाठीवर घेतले आणि इतर काही मित्रांच्या मदतीने गड उतरायला सुरुवात केली. गावकऱ्यांच्या व मित्रांच्या मदतीने प्रवीणला चौक येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. बरगडय़ांना मार लागल्याने कामोठे येथील रुग्णालयात नेण्यात आले. इरशाळवाडीच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावांतील रहिवाशांनी या वेळी मोठी मदत केल्याचे परशुराम निरगुडे याने सांगितले. या वेळी एमजीएम रुग्णालयात प्रवीण पारधीची भेट घेतली असता त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती व दु:ख पाहायला मिळाले. ‘‘संध्याकाळी पाऊस पडत होता. मी जागाच होतो. घरात आई, बाबा, भाऊ, वहिनी असे सगळे होतो. अचानक काही तरी कोसळल्याचा आवाज आला आणि मी दबलो गेलो. काहीच कळाले नाही. माझ्या छातीला मार लागला आहे. दम लागतोय,’’ असे त्याने सांगितले.