नारळाच्या तेलात आणि दुधात तयार केलेल्या पदार्थाची चव अस्सल खवय्यांना केरळच्या अधिकच प्रेमात पाडते. सांताक्रूझच्या कलिना येथील थीरम या रेस्टॉरंटची खासियत म्हणजे केरळच्या तुम्हाला माहीत असलेल्या कोणत्याही पारंपरिक पदार्थाचं तुम्ही नाव घ्या, तो तुम्हाला येथे मिळेल.

‘गॉड्स ओन कंट्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळच्या किनारपट्टीवरूनच भारतात मान्सूनचे आगमन होते. हिरवा स्वर्ग म्हणूनही संबोधल्या जाणारा हा प्रदेश भाषा, संस्कृती, कला या सर्वच बाबतीत आजही आपलं वेगळेपण जपून आहे. मग खाद्यपदार्थाच्या बाबतीत तो कसा पिछाडीवर राहील? नारळाच्या तेलात आणि दुधात तयार केलेल्या पदार्थाची चव अस्सल खवय्यांना केरळच्या अधिकच प्रेमात पाडते. पण असे पारंपरिक पद्धतीचे पदार्थ आपल्या शहरात मिळणं जरा मुश्कीलच असतं. केरळी पदार्थाच्या बाबतीत मात्र आता चिंता करण्याचं कारण नाही. कारण सांताक्रूझच्या कलिना येथील थीरम (मल्याळम भाषेत किनाऱ्याला थीरम म्हणतात) या रेस्टॉरंटची खासियत म्हणजे केरळच्या तुम्हाला माहीत असलेल्या कोणत्याही पारंपरिक पदार्थाचं तुम्ही नाव घ्या, तो तुम्हाला येथे मिळेल.

केरळमधील कालिकतचे मूळ रहिवासी असलेल्या रबिन बालन आणि निखिल चंद्रन या दोन मित्रांनी ही पारंपरिक मेजवानी मुंबईकरांसाठी आणली आहे. थीरममध्ये केरळी पदार्थाच्या मेजवानीला सकाळीच सुरुवात होते. इडली सेट, इडियप्पम, व्हाईट पुट्टू, ब्राऊन पुट्टू (दळलेल्या तांदळापासून तयार केलेला आणि त्यावर नारळाचा किस लावलेल्या भाताचा गोलाकार सिलिंडर जो चटणी किंवा सांबारसोबत खाता येतो.), डोश्याचे प्रकार, अंडा डोसा, हाफ फ्राय डोसा, उत्तप्पा, केरळा पराठा सकाळपासूनच मिळतो. सोबतीला समोवर नावाच्या कलाकुसर केलेल्या भांडय़ात तयार केलेला स्पेशल ‘अडिचा चहा’ पण मिळतो.

तुम्ही व्हेज असाल किंवा नॉनव्हेज, थीरममध्ये दोन्ही प्रकारचे पदार्थ तितकेच चविष्ट आहेत. येथे साधं पाणी न देता कोकम सरबतासारखं दिसणारं लाल रंगाच्या आयुर्वेदिक गरम पाण्याने तुमचं स्वागत होतं. दुपारी येथे केळीच्या पानात व्हेज थाळी सव्‍‌र्ह केली जाते. दोन प्रकारच्या सुक्या भाज्या, ब्राऊन किंवा व्हाईट राईस (अनलिमिटेड), सांबार, ताक, तळलेली मिरची, पापड आणि पायसम इत्यादींचा त्यामध्ये समावेश असतो. रोज भाज्या आणि गोड पदार्थ वेगळा. या परिपूर्ण थाळीची किंमत आहे केवळ सत्तर रुपये. पराठा किंवा डोसा खायचा असेल तर ते पर्यायही उपलब्ध आहेत. नॉनव्हेज खाणारी मंडळी ही थाळी घेऊन त्याच्या सोबतीला मासे किंवा चिकन मागवतात. मासे खायचे असतील तर केरला स्टाईल फिश मोली, कुडंपुलीयीट्टामीन करी, फिश कुरूमुलकिट्टथू, फिश थेंगाअराचथू हे प्रकार आहेत. चिकन मुलाकिट्टथू, चिकन कुर्मा, नादान कुरूमुलाकूकोझी, कंथारी चिकन, चिकन उलारथियथू, चिकन वारूथरचाथू हे कधीही न ऐकलेले पदार्थ आहेतच पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धतही वेगळी आहे. नारळाचं तेल आणि मसाल्यांच्या वापरामुळे चवीतही खूप फरक पडतो. व्हेज केरळी स्टय़ूमध्ये विविध फळभाज्या असतात. पण केरला चिकन स्टय़ू हे पूर्णपणे तूप आणि नारळाच्या दुधामध्ये तयार केलेलं असतं. थाई करीसारखं दिसणारं हे क्रिमी स्टय़ू ज्यांना मसालेदार नॉनव्हेज आवडत नाही त्यांनी आवर्जून खाण्यासारखं आहे. यांच्याकडील मलबार दम बिर्याणीही इतर ठिकाणी मिळणाऱ्या बिर्याणीपेक्षा वेगळी. केळीच्या पानात आणि कॉटनच्या कपडय़ामध्ये वाफवून ती तयार केली जाते. खोबरं, हिरव्या मिरचीची चटणी आणि रायत्यासोबत ती सव्‍‌र्ह केली जाते. बिर्याणीला सगळीकडेच बासमती तांदूळ वापरला जातो. इथे मात्र बारीक तांदूळ वापरून बिर्याणी तयार केली जाते.

साध्या पराठासोबतच इथे चिकन कोथू परोठा, अंड कोथू परोठा, स्टफ परोठा आणि चिली परोठासुद्धा आहेत. केरळचे अतिशय पारंपरिक मानले जाणारे केरळा कप्पा पदार्थही येथे मिळतात. त्यामध्ये कप्पा वेविचाथू, कप्पा चिकन मिक्स, कप्पा बिर्याणीचा मेन्यूमध्ये समावेश आहे. कोलंबीच्या किंवा मटणाच्या कालवणामध्ये वाफवलेले राईस डम्पलिंग्स टाकून तयार करण्यात येणारा कोझिपिडी हा प्रकारही मुद्दामहून चाखण्यासारखा आहे.

संध्याकाळच्या अल्पोपाहारामध्येही परिप्पू (दाळ) वडी, कांदा वडा, पझम पोरी (तांदळाच्या पिठामध्ये केळे बुडवून त्याला नारळाच्या तेलात तळलं जातं), स्टफ बनाना (नारळाचा किस केळ्यामध्ये भरून त्याला तुपात तळलं जातं), केरळमध्ये चहासोबत खाल्ला जाणारा पारंपरिक पदार्थ सुगियन, इलायडा (केळीच्या पानात गुंडाळलेला वाफवलेल्या मोदकासारखा गोड पदार्थ), कायप्पम उन्नकय्या असे वेगळेच तिखट आणि गोड पदार्थ येथे खायला मिळतात.

दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही येथे आलात तरी केरळी पदार्थाची रेलचेल पाहायला मिळेल. सर्व पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे मसाले खास केरळवरूनच मागवले जातात त्यामुळे चवीमध्ये अजिबात उन्नीस-बीस नसतं. खास केरळी पद्धतीने तयार केलेले बदक, शिंपले, करिमीन, खेकडा, स्क्विड, कोलंबी खायची असेल आगाऊ  ऑर्डर द्यावी लागते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पदार्थाच्या किमती, प्रमाण आणि चव यांचं गुणोत्तर प्रत्येकाला आवडेल आणि परवडेल असं आहे. त्यामुळे मुंबईच्या किनाऱ्यावर बसून केरळच्या पारंपरिक पदार्थाचा आस्वाद घ्यायचा असेल तर या जागेला पर्याय नाही.

थीरम रेस्टॉरंट 

  • कुठे? चर्च रोड, कलिना, अवर लेडी ऑफ इजिप्त चर्च, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई</li>
  • कधी- सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत

 

प्रशांत ननावरे

nanawareprashant@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@nprashant