- पुनर्बाधणीसाठी दीड वर्ष बंद ठेवल्यानंतर दुरुस्ती करण्याचा निर्णय
- रामतनू माता–बाल रुग्णालय, तुर्भे
पुनर्बाधणी करायची की डागडुजी या द्विधेमुळे तुर्भे येथील रामतनू माता-बाल रुग्णालय गेले दीड वर्ष बंद आहे. त्यामुळे रुग्णांना वाशी आणि ऐरोली येथील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे. हे रुग्णालय केव्हा चालू होणार, असा प्रश्न परिसरातील रहिवाशांना पडला आहे.
मैदानासाठी राखीव असलेल्या सिडकोच्या भूखंडावर १९९६-९७ दरम्यान रुग्णालय सुरू करण्यात आले. दोन लाख लोकसंख्या असलेल्या तुर्भे विभागासाठी येथे ५० खाटांची सोय आहे. इंदिरानगर, हनुमाननगर, गणेशपाडा, सानपाडा सेक्टर-२१, २२, बोनसरी येथील रुग्ण या रुग्णालयाचा लाभ घेत. इथे स्लॅबमधून गळती होत आहे. स्लॅबचा काही भाग पडल्यामुळे आतील सळया दिसत आहेत. धोकादायक बांधकाम म्हणून दीड वर्षांपासून रुग्णालय बंद आहे.
कर्मचाऱ्यांना नेरुळ येथील माता-बाल रुग्णालयात नियुक्त करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २२ डिसेंबरला या रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही कर्मचारी येऊन इमारतीच्या काही भागांची मापेही घेऊन गेले आहेत.
या रुग्णालयात याआधी डागडुजी करून लिफ्ट बसवण्यात आली होती, मात्र त्यानंतर अचानक रुग्णालय बंद करण्यात आले. ते दीड वर्ष बंद आहे. महिलांना वाशीतील रुग्णालय गाठावे लागते. तेथेही उपचार होतील याची खात्री नसते. महासभेमध्ये या रुग्णालयाबाबतचा मुद्दा मांडला आहे. प्रशासनाच्या घोळात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
– शुभांगी पाटील, नगरसेविका
महापालिकेने मैदानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण करून रुग्णालय बांधले आहे. त्यांनी अतिक्रमण केले नसल्यास रुग्णालयासाठी राखीव भूखंड असल्याचा पुरावा दाखवावा. रुग्णालयाची खरी गरज इंदिरानगर, हनुमाननगर येथील रहिवाशांना आहे. तिकडचे रुग्ण येथे येतात. रोज येथे ६००० रुग्ण येत. प्रशासनाने नवीन इमारत बांधून रुग्णालय सुरू करावे.
– रामचंद्र घरत, नगरसेवक
महापालिकेने अतिक्रमण केलेले नाही. ही जागा मैदान व रुग्णालयासाठी आरक्षित होती. या रुग्णालयाच्या इमारतीचे पुन्हा स्ट्रक्टरल ऑडिट करण्याचा विचार सुरू आहे. डागडुजी करून कमी खर्चात आणि लवकरात लवकर सुविधा पुरविण्याचा प्रयत्न आहे.
– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त