कचराकुंडय़ा भरल्या; रित्या करण्यात अनियमितता यामुळे परिसरात दुर्गंधी

नवी मुंबईलगत असलेल्या आशियातील सर्वात मोठय़ा औद्योगिक वसाहतीत कचरा वहन पूर्णपणे कोलमडले आहे. पालिकेचे कर्मचारी नियिमतपणे कचरा हटवत नसल्यामुळे कचराकुंडय़ा भरून आजूबाजूला कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अधूनमधून पडणाऱ्या पावसाने कचरा कुजत असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

नवी मुंबईतील एमआयडीसी भागातील स्वच्छतेची जबाबदारी पालिकेवर आहे, मात्र गेल्या काही आठवडय़ांपासून हे काम नियमितपणे केले जात नाही. त्यामुळे कचराकुंडय़ा भरल्या आहेत. परिसरात कामानिमित्त येणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. औद्योगिक वसाहत असल्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणात ई-कचरा गोळा होतो. काही ठिकाणी झोपडपट्टी आहे. तिथे झोपडपट्टीतून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचीही भर पडत आहे. या परिसरात अनेक खाद्यपदार्थ विक्रेते असून त्यांचाही कचरा येथे साचत आहे.

येथे रहिवासी वस्तीप्रमाणे ठरावीक वेळेत घंटागाडी येत नाही. अधिकारी वाहनांतून थेट कंपनीच्या आवारात जातात. त्यामुळे त्यांना या अस्वच्छतेचा आणि दुर्गंधीचा उपद्रव होत नाही, मात्र पादचाऱ्यांना आणि रिक्षा, बसगाडय़ांतून प्रवास करणाऱ्या नोकरदारांना मात्र हा उपद्रव सहन करावा लागत आहे.

मी महापे सर्कल येथे उतरून पायी कंपनीत जातो. वाटेत दोन कचराकुंडय़ा कायम भरलेल्या असतात. एवढा कचरा साठला आहे की एका गाडीत मावत नाही त्यामुळे उरलेला कचरा तिथेच राहतो आणि त्यात भर पडत राहते.

– अनिकेत म्हसळकर (नोकरदार)

एमआयडीसी परिसरातील कचऱ्याच्या प्रश्नाची पूर्ण माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच ठरलेल्या वेळापत्रकानुसार कचरा उचलण्यात येईल.

– तुषार पवार, घनकचरा उपायुक्त