सिडकोच्या वतीने उच्च दाब विद्युतवाहिन्यांच्या खालील भाडेपट्टय़ावर देण्यात आलेल्या जमिनींचा मोठय़ा प्रमाणात गैरवापर होत असून प्रकल्पग्रस्त व सामाजिक संस्थांसाठी केवळ वृक्षसंवर्धन किंवा नर्सरीसाठी देण्यात आलेल्या या भूखंडावर टँकर लॉबीसाठी कूपनलिका, चायनीज हॉटेल, गॅरेज, गोडाऊन, भंगारमाफियांचे सामान, शेतघर यांची रेलचल असल्याचे सर्रास दिसून येत आहे. या जमिनींचा व्यावसायिक वापर आता केला जात आहे. सिडकोने नवी मुंबई, पनवेल, उरण भागांत अशा प्रकारे ११२ संस्थांना व प्रकल्पग्रस्तांना हजारो एकर जमीन अतिक्रमण होऊ नये यासाठी देण्यात आली आहे; पण सध्या त्याबाबत उलट चित्र आहे. वाशी रेल्वे स्थानकाबाहेर अशाच एका गैरवापर करण्यात आलेल्या विस्र्तीण भूखंडावरील अतिक्रमण सिडकोने बुधवारी हटविले.
नवी मुंबई सिडको क्षेत्रातून टाटाची कमीत कमी साठ किलोमीटरची उच्च दाब विद्युतवाहिनी जात आहे. सिडकोने नवी मुंबईतील ३४३ किलोमीटर जमीन संपादन करताना या उच्च दाब वाहिनीखालील जमिनीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये यासाठी या जमिनीचे भूखंड भाडेपट्टय़ावर सामाजिक संस्था व काही प्रकल्पग्रस्तांना दिलेले आहेत. या उच्च दाब विद्युतवाहिन्यांच्या खाली कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नसल्याने त्या ठिकाणी वनराई, नर्सरी, भाजीपाला लावण्यात यावा असे अभिप्रेत होते, पण या भूखंडांचा मोठय़ा प्रमाणात गैरवापर झाला असून सिडकोचे त्याकडे लक्ष नाही. ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, नेरुळ, बेलापूर, खारघर या भागांतून खोपोलीहून मुंबईकडे जाणाऱ्या या उच्च दाब विद्युतवाहिन्यांखाली आता गॅरेज, हॉटेल, चायनीज रेस्टॉरन्ट, टँकर लॉबीसाठी कूपनलिका, शेतघर, सव्‍‌र्हिस सेंटर असे व्यावसायिक उपक्रम सुरू झाले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी तयार झालेल्या शेतघरामुळे नियमित मेजवान्या होत असतात. यातील अनेक जागा या मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्यातील काही भाग भाडय़ानेदेखील देण्यात आला आहे. अशाच वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील शेतघराजवळील गोडाऊन व भंगारमाफियाच्या सामानावर सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हातोडा चालविला. हे बांधकाम गेली अनेक वर्षे होते, पण त्यावर कारवाई करण्याची हिंमत सिडकोने दाखविली नव्हती. राज्यात गेली अनेक वर्षे आघाडी सरकार असल्याने बहुतांशी जमिनी या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी बळकावलेल्या आहेत. त्यामुळे त्यावर आतापर्यंत कारवाई केली जात नव्हती. यातील अनेक भूखंडांचा वापर हा निवडणूक काळात मेजवानी झोडण्यासाठीदेखील केला जात असल्याचे आढळून आले आहे.