आज पुन्हा बैठक ; वाहतूक समस्या सोडविण्यासाठी धरणे आंदोलन सुरुच
उरणमधील जनतेला सतावणाऱ्या जड वाहनांच्या वाहतूक समस्येची सोडवणूक करण्यासाठी उरण सामाजिक संस्थेचे बेमुदत धरणे आंदोलन मंगळवारपासून करळच्या दिबा पाटील चौकात सुरू झाले आहे. या आंदोलनाची दखल घेत जेएनपीटी प्रशासनाने आंदोलनकर्त्यांसोबत चर्चेला सुरुवात केली आहे. बुधवारी झालेल्या चर्चेत जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी समस्या दूर करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत पुन्हा एकदा चर्चेतून मार्ग काढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आंदोलन कर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता गुरुवारी दुपारी ३ वाजता सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती उरण सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
रस्त्याच्या असुविधेमुळे अनेकांचे बळी घेणाऱ्या अपघात आणि वाहतूक कोंडीवर उपाययोजना करून उद्ध्वस्त होणारी कुटुंब वाचवा अशी आर्त हाक देत उरण सामाजिक संस्थेने बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला उरणचे आमदार मनोहर भोईर, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, कामगार नेते भूषण पाटील, श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, जिल्हा परिषद सदस्य तुकाराम कडू, वैजनाथ ठाकूर यांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या आंदोलनाला धार आली आहे. या आंदोलनापूर्वी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किरीट पाटील यांनी तीन दिवसांचे उपोषण केले होते. त्यांनाही जेएनपीटी व्यवस्थापनाने चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याने पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. फक्त जेएनपीटी प्रशासन नव्हे तर या समस्येला मुख्य जबाबदार असलेल्या सिडको, राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण यांच्याही अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलाविण्यात यावी, अशी मागणी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी केली आहे. बुधवारी झालेल्या बैठकीला जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर, वाहतूक विभागाचे अधिकारी तसेच रस्ते विकास विभागाचेही अधिकारी उपस्थित असल्याची माहिती संस्थेचे सचिव संतोष पवार यांनी दिली.