उरणमधील दोघांनी जीव वाचवला

आधुनिक शहर म्हणून मिरवणाऱ्या नवी मुंबईकरांच्या अभिमानाचे स्थान असलेल्या वेगवान पामबीच रस्त्यावर माणुसकीचा थांबा मात्र नसल्याचे सोमवारी सकाळी एका घटनेतून स्पष्ट झाले. एका बेदरकार वाहनचालकाने धडक दिल्यामुळे जखमी झालेल्या पावविक्रेत्या सायकलस्वाराला मदतीसाठी दोन तास वाट पाहावी लागली. उरणहून आलेल्या दोघांनी त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत तो रस्त्यावर विव्हळत पडून होता. एकही वाहन त्याच्या मदतीसाठी थांबले नाही.

वाशीतील पामबीच रस्त्यावरील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपाजवळून जाणारे सायकलस्वार पाव विक्रेते रोनित सिंग (४०) यांना सकाळी दहा वाजता एका सॅन्ट्रो कारने उडविले. मात्र तो वाहनचालक थांबला नाही. त्यानंतर दोन तास रोहिणी तिथेच विव्हळत होत पडले होते.

त्याच वेळी उरणहून वाशीत आलेले सर्पमित्र अनुज व त्यांचा भाऊ मृणाल ठाकूर यांनी त्यांना पाहिले. त्यांनी तातडीने गाडी थांबविली आणि त्यांना वाशी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. कायम वर्दळ असलेल्या पामबीच रस्त्यावरील एकाही वाहनचालकाला त्यांना मदत करावीशी वाटली नाही.

रोनित यांच्या डोक्याला आणि हाता-पायांना दुखापत झाली आहे. १५ टाके पडले आहेत. रक्तस्रावामुळे त्यांच्या जिवावर बेतण्याचीही शक्यता होती. अपघातातील व्यक्तीला रुग्णालयात नेल्यास पोलीस त्रास देतील, या भीतीने अनेकदा मदत करणे टाळले जाते, मात्र वेळेत उपचार न मिळाल्यास जिवावर बेतू शकते.