प्रकल्पग्रस्तांचा तूर्त स्थलांतराला विरोध, चर्चेचे गुऱ्हाळ सुरू
नवी मुंबईतील नियोजित विमानतळावरून डिसेंबर २०१९ अखेपर्यंत पहिले उड्डाण करण्याच्या दृष्टीने सिडकोसाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा असल्याने व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी प्रकल्पग्रस्तांबरोबर गणेशोत्सवाच्या निमित्ताने संवाद साधण्यास सुरुवात केली असून, दहा गावापैकी चिंचपाडा व कोपर गावातील सार्वजनिक गणेशोत्सव व प्रकल्पग्रस्तांच्या भेटीनंतर शुक्रवारी गणेशपुरी गावातील ग्रामस्थांबरोबर संवाद साधला. प्रकल्पग्रस्तांचा प्रकल्पाला विरोध नसून शेवटची मागणी पूर्ण होईपर्यंत स्थलांतर करणार नाही या भूमिकेमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संभ्रमावस्था दिसून आली. चर्चा सुरू असताना ज्या प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या पूर्ण झालेल्या आहेत त्यांनी स्थलांतर सुरू केल्यास हा प्रकल्प लवकर पूर्ण होऊ शकतो अन्यथा आणखी वीस वर्षे हा प्रकल्प रखडण्याची भीती आता सिडको वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबईतील विमानतळ लवकर कार्यान्वित व्हावे असे केंद्र सरकारपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत सर्वाना वाटत आहे, मात्र जुलैपासून सुरू होणाऱ्या स्थलांतराच्या शेवटच्या टप्प्यात काही नेत्यांच्या शिकवणीनुसार प्रकल्पग्रस्तांनी घेतलेली अडवणुकीची भूमिका हा प्रकल्प आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण करीत आहे.प्रकल्पग्रस्तांचे मन परिवर्तन व्हावे यासाठी गगराणी यांनी विमानतळ प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या गावांशी संवाद साधण्यास सुरुवात केली असून मंगळवारी कोपर व चिंचपाडा येथील प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. या चर्चेअंती प्रकल्पग्रस्तांचा प्रकल्पाला विरोध नाही असे समजले. मात्र, आता नाही तर नंतर कधीच तुमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत अशी शिकवण काही स्थानिक नेत्यांनी दिल्याने काही प्रकल्पग्रस्त अडून बसले आहेत. यात प्रलंबित प्रश्न असलेली गावातील चार कुटुंबे असली तरी त्यांच्यासाठी संपूर्ण गावाला वेठीस धरण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्येही फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थलांतराला संमती देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना काही नेत्यांकडून धमकावले जात असून सर्व मागण्या पूर्ण करण्याचा अट्टहास धरला जात आहे. एक गाव एक गणपती संकल्पना राबविणाऱ्या कोपर गावातील शून्य पात्रता एका क्षणात मंजूर करण्यास तयार असलेल्या गगराणींपुढे पनवेलमधील दुसऱ्या समस्यांचे कारण पुढे करण्यात आले. सार्वजनिक प्रश्नांबरोबरच वैयक्तिक प्रश्नदेखील प्रतिष्ठेचे करण्यात आल्याने स्थलांतराच्या मुद्दय़ावर प्रकल्पग्रस्त वेगळाच मुद्दा उपस्थित करून पूर्णविराम देत असल्याचे दिसून आले. सिडकोने सुरू केलेल्या या संवादाच्या धावपट्टीवर प्रकल्पग्रस्तांच्या स्थलांतराचे विमान हेलकावे खात असल्याचे दिसून येत आहे.
प्रकल्प रखडण्याची शक्यता?
साडेबावीस टक्के योजनेतील भूखंड, विमान कंपनीत शेअर, रोजगार असे देशातील सर्वोत्तम पॅकेज देऊनही प्रकल्पग्रस्त छोटय़ा छोटय़ा मागण्यांसाठी हट्टाला पेटल्याने हा प्रकल्पच रद्द करण्याचा विचार केंद्रीय विमान उड्डाण मंत्रालयाने सुरू केला आहे. तसे काही झाले नाही तरी हा प्रकल्प रखडण्याची शक्यता मात्र जाणकारांनी व्यक्त केली आहे.
सर्व प्रकल्पग्रस्त प्रेमळ आणि मनमिळावू आहेत, पण प्रकल्पाला विरोध नाही असे सांगताना स्थलांतराला सहकार्य करीत नसल्याचे दिसून आले आहे. सिडको चार पावले पुढे चालण्यास तयार आहे, पण प्रकल्पग्रस्तांनीही दोन पावले पुढे टाकायला हवीत. शेवटची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत गाव सोडणार नाही ही भूमिका प्रकल्पाला बाधक आहे. याबाबत प्रकल्पग्रस्तांमध्ये जनजागृती केली जाईल. प्रकल्पग्रस्त सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.
भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको