नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती तसेच समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती अंतर्गत महिला मंडळे, संस्था, बचत गट यांना यंदाही बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली
आहे. दिवाळीनिमित्त उत्पादित केलेले फराळाचे पदार्थ, उटणे, आकाश कंदील, सौंदर्य प्रसाधने, शोभेच्या वस्तू, मेणबत्ती व पणत्या इत्यादी वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्याद्वारे या मंडळांचे सक्षमीकरण करता यावे हा यामागे हेतू आहे.
महानगरपालिकेने महिला मंडळे, संस्था बचत गट यांना
५० टक्के शुल्क आकारून नवी मुंबई क्षेत्रात स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. या स्टॉलसाठी इच्छुक असणारी महिला मंडळे, संस्था, बचत गट यांनी ४ नोव्हेंबपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. अर्ज नमुने महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालयांत तसेच उपआयुक्त (समाज विकास) नवी मुंबई महानगरपालिका समाज विकास विभाग, बेलापूर या ठिकाणी उपलब्ध आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व महिला मंडळे, बचत गटांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा गवते आणि समाज कल्याण व झोपडपट्टीसुधार समिती मोनिका पाटील यांनी केले आहे.