नवी मुंबई महानगरपालिकेने कर थकबाकीदारांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. स्थानिक संस्था कर (एलबीटी)थकवणाऱ्या ४८५ व्यापारी आणि व्यावसायिकांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. एक हजार ३७१ मालमत्ता करधारकांना थकीत रक्कम आठ दिवसांच्या आत भरण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. पालिका क्षेत्रात आवश्यक सुविधा पुरविणे आणि त्यात सुधारणा करण्यासाठी स्थानिक संस्था कर (एलबीटी) आणि मालमत्ता कर महत्त्वाचे उत्पन्न स्रोत आहेत. यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
१ एप्रिल ते १६ जून या कालावधीत स्थानिक संस्था कराची वसुली २१३ कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी १६ जून २०१५ पर्यंत स्थानिक संस्था कराची वसुली ९९ कोटी रुपये झाली होती. त्या तुलनेत यंदा स्थानिक संस्था कराच्या वसुलीत ११५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे, तसेच मालमत्ता कराची वसुली १ एप्रिल ते १६ जूनपर्यंत १२६ कोटी रुपये इतकी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ८० कोटी रुपयांची वसुली झाली होती. मालमत्ता करातही ४६ कोटी रुपयांची मोठी वाढ झाली आहे. थकीत करधारकांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून ४८५ स्थानिक संस्था कर थकबाकीदारांची बँक खाती गोठविण्यात आलेली आहे. दरम्यान येत्या काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने सांगितले.