नवी मुंबई महापालिकेचा इशारा; बाधित आल्यास जवळच्या काळजी केंद्रात थेट रवानगी

नवी मुंबई : घरात बसून कंटाळा आल्याने सकाळी प्रभातफेरी आणि संध्याकाळी पाय मोकळे करणाऱ्या नागरिकांवर संक्रांत ओढवणार आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या या नागरिकांची प्रतिजन चाचणी करून त्याचा अहवाल बाधित आल्यास त्यांची रवानगी थेट जवळच्या काळजी केंद्रात केली जाणार आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांची सकाळ-संध्याकाळ संख्या वाढू लागल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली आहे. त्यावर हा चाचणीचा उतारा शोधण्यात आला आहे.

नवी मुंबईत मागील काही दिवसांत करोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. त्यामुळे पालिकेच्या कॉल सेंटरला येणाऱ्या दूरध्वनींची संख्यादेखील कमी झाली आहे. सरासरी २०० ते २५० कॉल येत होते. करोना  रुग्णांची संख्या घटू लागल्याने सकाळी प्रभातफेरीच्या नावाखाली व संध्याकाळी औषधे तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या सबबीने नागरिक बाहेर पडत आहेत. वाढती रहदारी हा प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरू पाहात आहे. त्यामुळे प्रभातफेरीसाठी बाहेर पडणारे व संध्याकाळी काही कारणास्तव पाय मोकळे करण्यास फिरणाऱ्या नागरिकांची भररस्त्यात प्रतिजन चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या या नागरिकांची प्रतिजन चाचणी अहवाल सकारात्मक आल्यास त्यांची थेट जवळच्या रुग्णशय्या असलेल्या काळजी केंद्रात रवानगी केली जाणार असून तशी माहिती नंतर कुटुबीयांना दिली जाणार आहे.

कामोठेत ९० जणांवर अदखलपात्र गुन्हे

नागरिकांना भोंग्याद्वारे सूचना देऊनही घराबाहेर पडल्याने कामोठे पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ९० जणांना थेट पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हे दाखल केले. तसेच फौजदारी कार्यवाहीनंतर त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

नागरिक संचारबंदीच्या काळात व्यायामासाठी तसेच पहाटे चालण्यासाठी घराबाहेर पडतात. सायंकाळी पाच वाजल्यानंतर पुन्हा आठ वाजेपर्यंत नागरिक पायी चालण्यासाठी वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर आणि उद्यानात जातात. कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी वेळोवेळी सूचना देऊनही घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने मंगळवारपासून धरपकड केली.

शहरातील करोना रुग्णांची संख्या ५००च्या खाली येत आहे. ही प्रशासनाच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला थोडीशी उसंत मिळाली आहे. मात्र रुग्णसंख्या कमी होत असल्याचे पाहून नागरिक बाहेर पडू लागले आहेत. विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांची पतिजन चाचणी केली जाणार आहे. – अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका