व्हॉट्सअॅपवर आलेल्या एका संदेशाला नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने गडचिरोलीच्या आदिवासी बांधवांना मोठी दिवाळी भेट मिळणार आहे. गडचिरोली येथील आदिवासींना मदत करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी विविध सामाजिक संघटना, कंपनी व नागरिकांना आवाहन केले होते. त्यानुसार जमलेले सुमारे २० लाख रुपये किंमतीचे साहित्य तीन ट्रकमधून शुक्रवारी धाडण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना आदिवासींसाठी पोलीस काही करू शकतील का, असा संदेश पाठविला होता. दीक्षित यांनी हा संदेश राज्यातील सर्वच पोलीस आयुक्त व अधीक्षकांना पाठविला होता. या मदतीच्या आवाहनासाठी नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांचे आवाहनाचे पत्र व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरू लागले. या कामामध्ये नवी मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामध्ये परिमंडळ २ म्हणजेच पनवेल व उरण तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी पुढाकार घेतला. या मदतकामी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती व सामाजिक संघटनांनी चांगले सहकार्य केले. पोलिसांकडे जमा झालेल्या मदतीमध्ये स्टीलची ताटे, वाटी, ग्लास, प्लेट, पातेले अशी पाच हजार १३० भांडी, एक हजार साडय़ा, दोन हजार शर्ट-पॅण्ट, १ हजार टी शर्ट, एक हजार ट्रॅक सूट, २४१ गोणी भरून जुने मात्र घालण्यायोग्य अवस्थेतील कपडे, पाच गोणी साखर व क्रीडा साहित्य याचा समावेश होता. या कामी मदत करणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी पोलीस आयुक्तालयात एक कार्यक्रम झाला. मदतकर्त्यांमध्ये पनवेल येथील कापड बाजार असोशिएशन, ज्वेलर्स असोशिएशन, अस्पात कंपनी, उरण परिसरातील नीलकमल लॉजिस्टिक प्रा. लिमीटेड, हिंदू टर्मिनल, रोटरी क्लब, एपीएम टर्मिनल, ओशनगेट मिनरल, कन्स्ट्रक्शन टर्मिनल तसेच तळोजा येथील तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, वाशी येथील मराठी साहित्य संस्कृती मंडळ, पुणे येथील गुडविल इंडिया व सावित्री फोरम अशा विविध संघटना व दानशूर व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वाना कृतज्ञता पत्रे देण्यात आली. सावित्री फोरममध्ये पांढरे यांच्या पत्नी दीपाली पांढरे या कार्यरत आहेत. पुण्याच्या या संस्थेने जुने कपडे घालण्यायोग्य करण्याचे महत्त्त्वाचे सहकार्य केले. व्हॉट्सअॅपवरील एका संदेशामुळे नवी मुंबईकरांनी तात्काळ केलेल्या मदतीचे कौतुक या वेळी पोलीस आयुक्तांनी या आभारप्रदर्शनाच्या कार्यक्रमावेळी केले.