नवी मुंबई पोलीस दलाच्या navimumbaipolice.org या संकेतस्थळाचे मंगळवारी नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
राज्यभरातील पोलीस खात्याचा कारभार लोकाभिमुख व्हावा या उद्देशाने राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालयांना स्वत:चे संकेतस्थळ बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी संकेतस्थळ केले आहे. या संकेतस्थळावर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची इत्थंभूत माहिती तसेच विविध परवाने, परवानग्या, कायदेशीर बाबी, सुरक्षाविषयक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. कायदेशीर बाबींसाठी नागरिकांना पोलीस ठाण्यात जाऊन कागदपत्रे जमा करण्याऐवजी या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने पोलीस ठाण्याला माहिती पाठविण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
पोलीस खात्याशी संबंधित वाहतूक शाखा, महिला साहाय्य कक्ष, गुन्हे शाखांचाही या संकेतस्थळात समावेश करण्यात आला आहे. या संकेतस्थळाचा वापर अधिकाधिक नागरिकांनी करावा व काही सूचना अथवा अडचणी असल्यास आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात असे आवाहन या वेळी आयुक्त प्रभात रंजन यांनी केले. तर नवी मुंबई पोलिसांचे उकळकेएठ’र उडढ हे अॅप्लिकेशन नागरिकांसाठी उपलब्ध आहे. या अॅपच्या माध्यमातून महिलांसाठी एसओएसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीत महिलांनी एसओएसचे बटन दाबल्यास त्यांच्या चार नातेवाईकांना तसेच नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला संदेश मिळणार आहे.