नवी मुंबई पालिका क्षेत्रातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे नवीन रुग्णालय बांधण्यासाठी बंद करण्यात आल्याने वाशी येथील पालिकेच्या मध्यवर्ती रुग्णालयावर ताण पडत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेरुळ येथील नगरसेवक विशाल डोळस यांनी बुधवारी मध्यरात्री पालिकेच्या अतिदक्षता विभागात जाऊन डॉक्टर, नर्स यांच्याशी दबंगगिरी करीत धिंगाणा घातला. विशेष म्हणजे अतिदक्षता विभागात कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करण्यास बंदी असताना या महाशयांनी विभागातील रुग्णाचे चित्रीकरण केले. यात महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले उपचार घेत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेरुळ सेक्टर ४८ येथील एक नगरसेवक विशाल डोळस यांनी रात्री बारा वाजता रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत जवादे यांना दूरध्वनी केला. त्यांचा एक रुग्ण मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात उपचार घेत असून त्याला वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात स्थलांतरित करावयाचे होते. त्यासाठी त्यांना एक खाट अतिदक्षता विभागात हवी होती. पालिकेचे नेरुळ व ऐरोली येथील दोन रुग्णालये बांधून तयार आहेत, पण वैद्यकीय यंत्रसामग्री व कर्मचारी वर्गाच्या तुटवडय़ामुळे ही रुग्णालय सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यात तुर्भे येथील माता बाल संगोपन केंद्राची इमारत मोडकळीस आल्याने ते रुग्णालयही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील रुग्णांचा लोंढा वाशी येथील रुग्णालयाकडे वळला आहे. त्यात नवी मुंबईपेक्षा चेंबूर, मानखुर्द, मुंब्रा, चिताकॅम्प या भागातील रुग्ण पालिकेच्या या रुग्णालयावर मोठय़ा प्रमाणात विसंबून आहेत. शहरात साथीच्या आजारांनी मध्यंतरी थैमान घातल्याने ओपीडीद्वारे उपचार करणाऱ्या रुग्णांची संख्या दोन हजारांच्या घरात गेली आहे. तीनशे खाटांच्या या रुग्णालयात साडेतीनशे रुग्ण उपचार घेत आहेत. हीच स्थिती अतिदक्षता व ट्रोमा केंद्राची आहे. या संवदेनशील स्थितीत डोळस यांनी त्यांच्या एका रुग्णासाठी खाटेची मागणी केली. तेव्हा डॉ. जवादे यांनी सध्या खाट उपलब्ध नसल्याचे नम्रपणे सांगितले. त्याचा राग येऊन डोळस यांनी रात्री अडीच वाजता थेट रुग्णालय गाठले. या वेळी त्यांच्या कार्यकर्त्यांचा लवाजमा सोबत होता. अतिदक्षता विभागात रुग्णाच्या नातेवाईकांनाही जास्त वेळ थांबू दिले जात नसताना या महाशयांनी चार-पाच टग्या कार्यकर्त्यांचे टोळके अतिदक्षता विभागात घुसवले होते. त्यानंतर त्यांनी येथील परिचारिका, साफसफाई कामगार, डॉक्टर यांना धारेवर धरले. या विभागात एक खाट रिकामी दिसत असताना मला तुम्ही खोटे का सांगितले, असा सवाल या नगरसेवक महाशयांचा होता. त्यानंतर त्यांनी पूर्ण अतिदक्षता विभागच डोक्यावर घेतला. नर्स आणि इतर कामगार सोबतचे ‘भाई’ बघून थरथर कापायला लागले होते. शेवटी या नगरसेवकाने रात्री अडीच वाजता डॉ. जवादे यांच्याशी पुन्हा संपर्क साधून त्यांच्या नावाने शिमगा केला. तुम्ही या पदाच्या लायकीचे आहात का? तुम्हाला या जागेवर कोणी बसविले, अशा शब्दांत या विशाल दृष्टिकोन लाभलेल्या नगरसेवकाने डॉ. जवादे यांच्यावर दबंगगिरी दाखविली.
डॉ. जवादे यांनी खाट उपलब्ध नसल्याचे बेधडक सांगितले. ते ज्या एक क्रमांकाच्या खाटेबद्दल बोलत आहेत तो दुपारी तीन वाजल्यापासून मोकळा होता. डॉक्टर असे का वागतात हे कोडे आहे
विशाल डोळस
डोळस यांच्या एका रुग्णाला अतिदक्षता विभागात खाट हवी होती. जी खाट डोळस यांना मोकळी दिसली ती शस्त्रक्रिया झालेल्या एका रुग्णासाठी राखून ठेवण्यात आली होती. फोर्टिज रुग्णालयातील कोटय़ाविषयी डोळस यांनी विचारणा केली असता उत्पन्नाची अट त्यांना सांगण्यात आली. त्या वेळी त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी मला अपशब्द वापरले.
डॉ. प्रशांत जवादे, अधिष्ठाता, पालिका रुग्णालय, वाशी