scorecardresearch

महावितरणचे दुर्लक्ष; ट्रक चालकाला झटका बसून दुखापत

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व बाजार आवारात उघडय़ा वीज पेटय़ांची दुरवस्था झालेली आहे. गेले कित्येक वर्षांपासून या वीजपेटय़ांची देखभाल दुरुस्ती न केल्याने आज या विजपेटय़ा धोकादायक झाल्या आहेत.

‘एपीएमसी’त उघडय़ा वीजपेटय़ांचा धोका!

नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व बाजार आवारात उघडय़ा वीज पेटय़ांची दुरवस्था झालेली आहे. गेले कित्येक वर्षांपासून या वीजपेटय़ांची देखभाल दुरुस्ती न केल्याने आज या विजपेटय़ा धोकादायक झाल्या आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ असून या ठिकाणी बाजारात कर्मचारी, व्यापारी, वाहतूकदार, ग्राहक, माथाडी कामगार, सफाई कामगार, सुरक्षारक्षक अशा अनेकांची सतत वर्दळ असते. बाजार समितीची स्थापना झाल्यापासून बाजार आवारातील वीजपेटय़ा व वीज वाहिन्या मोठय़ा प्रमाणात खराब झाल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. मागील आठवडय़ात दाना बाजारामध्ये एका ट्रक चालकाला उघडय़ा वीज वाहिन्यांचा झटका लागून गंभीर दुखापत झाली होती.
अशा अनेक घटना घडत आहे, भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे बाजार आवारातील वीजपेटय़ा व वीज वाहिन्यांची तपासणी करून त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे. याबाबत मनसे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी तक्रार केली आहे. सदर प्रकरण हे जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित असून लवकरच याबाबत तोडगा काढला जाईल असे आश्वासन महावितरणचे अधीक्षक राजराम माने यांनी दिले.
एपीएमसी बाजारात वर्षांनुवर्षे जुन्या देखभाल दुरुस्ती न केलेल्या वीजपेटय़ा आहेत. गेले कित्येक वर्ष त्यांची दुरुस्ती न केल्याने आज त्या विजपेटय़ा धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे यांची दुरुस्ती करण्याची मागणी महावितरणाकडे करण्यात आली आहे. – बाळासाहेब शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे सहकार सेना

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Neglect msedcltruck driver injured by shock danger open power boxes apmc amy

ताज्या बातम्या