जुन्या मीटरमध्ये सदोष ‘रीडिंग’मुळे महसुलात घट; जादा बिलाची ग्राहकांना भीती
विजेच्या सदोष ‘मीटर रीडिंग’मुळे महसुलातील घट भरून काढण्यासाठी पनवेल आणि उरण तालुक्यातील ३२ हजार मीटर बदलण्याचा निर्णय ‘महावितरण’ने घेतला आहे. वीजमीटर कमी युनिट दाखवत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात सामान्य नागरिकांच्या वीज बिलात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे; मात्र महावितरणने याचा इन्कार केला आहे. हा निर्णय सामान्यांच्या हितासाठीच घेतल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
पनवेल तालुक्यात सुमारे अडीच लाख वीजग्राहक आणि एक लाख वीजग्राहक उरण परिसरातील आहेत. २०१४ साली रोलॅक्स कंपनीचे पनवेल आणि उरण परिसरात ३२ हजार वीजमीटर बसविण्यात आले होते. हे वीजमीटर बसविल्यानंतर काही महिन्यांत हे मीटर कमी युनिट नोंदवत असल्याचे महावितरण कंपनीमधील अधिकाऱ्यांच्या ध्यानात आले. त्यामुळे कंपनीचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचे नोंदविण्यात आले. त्यामुळे रोलॅक्स कंपनीचे बसविलेले ३२ हजार वीजमीटर बदलण्याचे आदेश देण्यात आले. आजवर पनवेल आणि उरण परिसरामध्ये सुमारे साडेसहा हजार वीजमीटर बदलली आहेत. ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हे मीटर बदलण्याचे काम सुरू आहे. उन्हाळ्याच्या तापामुळे अनेक वीजग्राहकांना तीन ते पाच हजार रुपयांचे वीजबिल आले होते. पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे जुलै महिन्यात विजेचा वापर कमी होऊन वीजबिल कमी येईल, अशी अपेक्षा सामान्यांना होती. परंतु नवीन वीजमीटरमुळे वीजबिलात वाढ होईल, अशी भीती आहे.
- एक हजार व्ॉटचा हिटर तासभर चालविल्यास एक युनिट वीज वापर
- घरातील पंखा व ६० व्ॉटची टय़ुब सुमारे १६.५ तास चालल्यास दोन युनिट वीजवापर
- वातानुकूलित यंत्र, फ्रीज व दूरसंचार उपकरणांमुळे मोठय़ा प्रमाणात विजेची नोंद केली जाते. कोणतेही उपकरण एक हजार व्ॉटचे असल्यास ते एक तास चालल्यास वीजमीटरमध्ये एका युनिटची नोंद केली जाते.
- घरातील जुन्या विद्युतवाहिन्यांमुळे आणि विजेच्या जुन्या उपकरणांमुळे वीजगळती होण्याची शक्यता जास्त असते.
नवीन वीजमीटर बसवल्यानंतर ग्राहकांच्या बिलात कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही. जेवढा वापर वीजग्राहक करतील, तेवढेच वीजबिल त्यांना भरावे लागणार आहे. उलट अनेक महिने वीजमीटरचे कमी युनिट नोंदविल्यामुळे महावितरण कंपनीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन कंपनीचे वीजमीटर बसवताना महावितरण कंपनीला वीजग्राहकांनी सहकार्य केले पाहिजे.
– डी. बी. गोसावी, महावितरण, पनवेल विभाग कार्यकारी अभियंता