पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील पोलिसांनी पोलीस ठाण्यात आलेल्या सर्व फिर्यादींशी सौजन्याने वागण्याचा सल्ला दिल्याच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी तपासणी नाक्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी नागरिकांशी जरा सौजन्याने वागण्याचा सल्ला दिला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गतवर्षी दाखल झालेल्या एक हजारापेक्षा जास्त नवीन पोलीस कॉन्स्टेबलची नागरिकांप्रति असलेली वागणूक अरेरावी, असभ्य आणि असंस्कृत असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस आयुक्तांकडे गेलेल्या आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांना हा सल्ला देण्याची वेळ आली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र पनवेल व उरण तालुक्यातील काही शहरी भागासह तयार करण्यात आले आहे. राज्यातील लहान पोलीस आयुक्तालय म्हणून काही थेट आयपीएस अधिकारी या पोलीस आयुक्तालयाचा अधिभार घेण्यास नाके मुरडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या पोलीस आयुक्तालयाची हद्द खोपोलीपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. जेमतेम २० लाख लोकसंख्येचा भार असलेल्या या पोलीस आयुक्तालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तीन हजार पोलीस सध्या कार्यरत आहेत. त्यातील एक हजारपेक्षा जास्त पोलिसांची भरती गतवर्षी झालेली आहे. नव्याने पोलीस दलात आलेल्या या तरुण पोलिसांच्यात ऊर्मी आणि गूर्मी असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. कानाला अ‍ॅण्ड्रॉइड फोन, डोळ्यांवर गॉगल, व्यायामशाळेत कमावलेली शरीरयष्टी असे अनेक पोलीस सध्या ‘डय़ुटी’ करीत असल्याचे आढळून येते. नाकाबंदीच्या काळात या पोलिसांची अरेरावी व नागरिकांशी बोलण्याची पद्धत ही एखाद्या हिंदी चित्रपटातील खलनायकाला लाजवेल अशी आहे. दबंगगिरीची भाषा तर या पोलिसांच्या तोंडी नेहमीच असते. बंदोबस्तावर असलेले हे तरुण व महिला पोलीस सातत्याने चॅटिंग करीत असल्याचे दिसून येते. यात अनेक पोलिसांचा विवाह न झाल्याने यंदा कर्तव्य असलेल्या पोलिसांच्या प्रियकराबरोबरच्या गप्पांना तर ऊत आलेला दिसून येतो. महिला पोलीस तर या चॅटिंगमध्ये इतक्या गुंग असतात, की त्यांच्या आसपास सोनसाखळीचोरीची घटना घडली तरी त्यांचे लक्ष नसल्याचे उघड झाले आहे. हेल्मेट घालणे हा तर फार मोठा गुन्हा असल्याचे या तरुण पोलिसांना वाटते. त्यामुळे अनेक पोलीस हेल्मेट नावाचा प्रकार जवळ बाळगत नसल्याचे दिसून येते. काही पोलीस व अधिकारी अनुभवाअभावी असे वागत असल्याचे एका उच्च अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. पोलिसांच्या या दबंगगिरीविरोधात आयुक्तांनी सक्त आदेश दिले असून पोलिसांना हेल्मेट सक्तीचे केले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सध्या पोलिसांचे डझनभर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत. त्यामुळे संदेश देणे सुकर झाले असून उच्च अधिकारी, गुन्हे अन्वेषण विभाग, गुन्हे प्रकटीकरण विभाग, नेरुळ, वाशी, पनवेल, उरण, सर्व पोलीस ठाणी, खंडणीविरोधी पथक असे सर्व विभाग या ग्रुपद्वारे पोलीस आयुक्तांना जोडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बिट मार्शलसाठीही वेगळा ग्रुप असून आयुक्तांकडे गेलेली एक साधी तक्रार बिट मार्शलपर्यंत पोहचवली जात असून, त्याच्या कारवाईचा अहवालदेखिल व्हॉट्सअ‍ॅपवर घेतला जात आहे. काही अधिकाऱ्यांनी आरटीओचे अ‍ॅप्स डाऊनलोड करून घेतले आहेत. पॅरिस हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर सर्वच पोलीस आयुक्तालयांना अर्लट राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबईत अनेक ठिकाणी तपासणी वाढविण्यात आली असून, ही तपासणी करताना सर्वसामान्य नागरिकाला नाहक त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला पोलीस आयुक्तांनी दिला आहे.