जेएनपीटी, उरण परिसरातील वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब ठरू लागली असताना गेले दोन दिवस करळ ते दास्तान फाटादरम्यान दहा किलोमीटर तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब वरील करळ ते गव्हाण फाटादरम्यान वीस किलोमीटरच्या वाहतूक कोंडीला चालकांना तोंड द्यावे लागले. बंदरात जाणाऱ्या जड वाहनांची संख्या सुट्टीमुळे वाढल्याने ही कोंडी होत असल्याचे मत वाहतूक विभागाकडून व्यक्त केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण-पनवेल रस्त्यावरील करळ फाटा ते दास्तान फाटादरम्यान वाहतूक कोंडीत गुरुवारपासून वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यातच करळ फाटय़ावरील जेएनपीटीसह येथील दोन खाजगी बंदरांत जाणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभाग नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असल्याने करळ ते दास्तानदरम्यान ही कोंडी होत असल्याचे दिसत आहे. या चौकात वाहतूक नियंत्रणासाठीचे कर्मचारीच गैरहजर असल्याचे चित्र आहे. करळ ते दास्तानदरम्यानची कोंडी सकाळी ९ व सायंकाळी ६ वाजता होत असल्याने नोकरीनिमित्त ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

या संदर्भात उरणच्या वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर जगताप यांच्याशी संपर्क साधला असता आमच्याकडून योग्य ती यंत्रणा राबविली जात असल्याचा दावा त्यांनी केला. तर, न्हावा-शेवा विभागाचे वाहतूक निरीक्षक एस. डी. शिंदे यांनी पुढील तीन-चार दिवस बंदराला सुटी असल्याने सीमा शुल्क विभागाकडून परवानगी घेणाऱ्या कंटेनरची संख्या वाढल्याने कोंडीत वाढ झाल्याचे सांगितले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New traffic problem raised in karal dastan road
First published on: 26-12-2015 at 03:40 IST