नालेसफाई अंतिम टप्प्यात असल्याचा पालिकेचा दावा फोल; ५ दिवसांची मुदतवाढ

नवी मुंबईतील मान्सूनपूर्व कामे अखेरच्या टप्प्यात असल्याचा दावा पालिकेच्या वतीने करण्यात येत असला, तरीही पालिका क्षेत्रातील स्थिती या दाव्याशी विसंगत आहे. आयुक्तांनी मान्सूनपूर्व कामे २५ मेपूर्वी संपवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी १५ दिवसांपूर्वी दिले होते. कामे पूर्ण झाली नसल्याने गुरुवारी या कामांसाठी पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली, मात्र पालिका परिसरातील नाल्यांची स्थिती पाहता कामे अखेरच्या टप्प्यात असल्याचे दिसत नाही. अनेक नाल्यांतील गाळ अजूनही तसाच आहे. काही ठिकाणी काढलेला गाळ नाल्याच्या बाजूलाच ठेवण्यात आला आहे. नवी मुंबईत शहरी भागात ४५० किमी लांबीचे नाले आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली त्यांचे स्लॅब वारंवार तोडले जाते. निकृष्ट कामामुळे उघडे नाले, गायब झाकणे हीच स्थिती कायम दिसते.

डोंगराळ भागांतून निघून खाडीकिनाऱ्यापर्यंत येणाऱ्या दिघा, ऐरोली, कोपरखरणे, घणसोली, नेरुळ, बेलापूर या भागांतील मुख्य नाल्यांची सफाई पावसाळ्याच्या सुरुवातीला केली जाते, मात्र वर्षभर या नाल्यांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे रसायनमिश्रित सांडपाणी उघडय़ा नाल्यांतून वाहत असते. त्याच्या दरुगधीचा त्रास रहिवाशांना होतो. दिघा, बोनकोडे, कोपरखरणे, घणसोली, कोपरी, तुभ्रे, शिरवणे, जुईनगर परिसरातील छोटय़ा-मोठय़ा गटारांची सफाई करण्यात आलेली नाही. बोनकोडे, कोपरखरणे, खरणे गाव, कोपरी गाव, तुभ्रे सेक्टर २१, २२ शिरवणे, जुईनगर, करावे गाव, औद्योगिक वसाहतीमध्ये नाल्यांची संख्या सर्वाधिक ९२ आहे. या नाल्यांतील सांडपाणी प्रक्रिया न करता खाडीत सोडले जाते. परिणामी खाडीतील पाणी प्रदूषित होते. माथाडी वसाहतीअंतर्गत अंत्यत अरुंद नाले आहेत. त्यामुळे सांडपाणी या नाल्यांतून बाहेर येते. या नाल्यांची रुंदी वाढवण्यात आलेली नाही. योग्य उपाययोजना न केल्यामुळे यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

अनेक ठिकाणी जोड नाले समतल नाहीत. अशा ठिकाणी सांडपाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. कोपरखरणे सेक्टर ५ ते ८ या ठिकाणी अशा तक्रारी आढळून येतात. अशी समस्या बोनकोडे गाव, कोपरी गाव, वाशी गाव येथेही आहे. उघडे नाले वेळच्यावेळी साफ करण्यात येत नसल्यामुळे तसेच फवारणी वेळेत करण्यात येत नसल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. झोपडपट्टी परिसरामध्ये नालेसफाईनंतरही त्यात प्लास्टिकच्या पिशव्या टाकल्या जातात. त्यामुळे पावसाळ्यात समस्या निर्माण होतात.