सर्वाधिक तक्रारी अतिक्रमणाविरोधात

नवी मुंबई महापालिकेने सप्टेंबरपासून राबवलेल्या ई-प्रणालीला रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सप्टेंबरपासून आजवर या प्रणालीवर २,१६८ तक्रारी आल्या असून त्यापैकी २,०२९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. १३९ तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती पालिकेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. सर्वाधिक ६१२ तक्रारी अतिक्रमणांसंदर्भातील होत्या.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यांनतर ई-प्रणालीत सुसूत्रता आणली. पालिका क्षेत्रातील नागरी समस्यांच्या तक्रारी विभाग कार्यालयात जाऊन करण्याऐवजी ई-प्रणालीच्या माध्यमातून वेबसाइट व मोबाइल फोनद्वारे करता याव्यात म्हणून एनएमएमसी अ‍ॅप तयार करण्यात आले. या अ‍ॅपला रहिवाशांनी मोठा प्रतिसाद दिला. सप्टेंबरपासून २,१६८ तक्रारी या अ‍ॅपवर करण्यात आल्या.

ई-प्रणालीमध्ये विभाग कार्यालयात तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीचे सात दिवसांच्या आत तक्रार निवारण करणे आवश्यक असते. सात दिवसांत विभाग कार्यालयातून त्या तक्रारीचे निवारण झाले नाही, तर ती उपआयुक्तांकडे जाते. तिथे देखील सात दिवसांत ही तक्रार दूर केली गेली नाही, तर तक्रार अतिरिक्त आयुक्तांकडे जाते. अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावरही निराकरण न झाल्यास थेट पालिका आयुक्तांकडे तक्रार जाते. यापैकी फक्त ९ तक्रारी महापालिका आयुक्तांकडे गेल्या आहेत. बाकीच्या तक्रारी या विभाग कार्यालयात, उपआयुक्तांच्या किंवा अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावर सोडवण्यात आल्या आहे. एनएमएमसी ई कनेक्ट या अ‍ॅपद्वारे किंवा ल्लेू.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावर तक्रार नोंदवण्याची सोय आहे.

 

अतिक्रमण    ६१२

आरोग्य       २५४

रस्ते         २५१

शिक्षण       १६

मालमत्ता     ३८

ईटीसी केंद्र    २

अग्निशमन    ३

पदपथ       ५७

उद्यान       १५७

 

विभागवार         आकडेवारी

एलबीटी                     ६

परवाना                     ५०

पथदिवे                   १०६

क्रीडा                       ३४

प्रॉपर्टी टॅक्स              ११३

शौचालय                    २

सांडपाणी                 ५०

सामाजिक विकास   ४

घनकचरा               ११५

 

नगर नियोजन  ४२

एनएमएमटी    ८९

पाणी              १३६