कोपरखरणे सेक्टर-७ मधील डी मार्टवर पालिकेने कारवाई केली. विनापरवाना वस्तू विक्री केल्याप्रकरणी पहिला आणि दुसरा मजल्याला अतिक्रमणविरोधी पथकाने टाळे ठोकले. याच वेळी भूमिगत पार्किंग खुले करण्यात आले. अतिक्रमणविरोधी विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे आणि सहाय्यक संचालक सुनील हजारे यांच्या पथकाने डी मार्ट परिसराची पाहणी केली. त्यात नगररचना अभियंत्यामार्फत तांत्रिक तपासणीही करण्यात आली. यात त्यांना अनियमितता आढळून आली. भूमिगत पार्किंगसाठीच्या जागेत वस्तूंचा अतिरिक्त साठा, मार्टसमोरील जागेचा विनापरवाना वापर, वाहनचालकांना पार्किंग करता येणार नाही, अशा पद्धतीने वस्तूंची रचना केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. डी मार्टच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर कार्यालयासाठी परवानगी देण्यात आली आहे, तरीही त्या जागेची विनापरवानगी विक्री व्यवसाय करण्यात येत होता. त्यामुळे दोन्ही मजल्यांना टाळे ठोकण्यात आले.