सात रुपयांत रेल्वे स्थानक गाठा!

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम सेवेची (एनएमएमटी) पनवेलमधील बससेवा पितृपक्षानंतर सुरू होणार, अशी चर्चा असताना लोकहितासाठी ‘शुभस्य शीघ्रम’ या न्यायाने ही बससेवा तातडीने सुरू करण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. त्यानुसार येत्या शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून पनवेलमध्ये या सेवेचा प्रवास सुरू होत आहे. या सेवेसाठी पाठपुरावा करणाऱ्या सिटीझन्स युनिटी फोरमने पनवेलमध्ये अनेक ठिकाणी याबाबतचे […]

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम सेवेची (एनएमएमटी) पनवेलमधील बससेवा पितृपक्षानंतर सुरू होणार, अशी चर्चा असताना लोकहितासाठी ‘शुभस्य शीघ्रम’ या न्यायाने ही बससेवा तातडीने सुरू करण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. त्यानुसार येत्या शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून पनवेलमध्ये या सेवेचा प्रवास सुरू होत आहे. या सेवेसाठी पाठपुरावा करणाऱ्या सिटीझन्स युनिटी फोरमने पनवेलमध्ये अनेक ठिकाणी याबाबतचे प्रसिद्धी फलक लावले आहेत.
पनवेल शहरात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहर ते रेल्वेस्थानक अशी बससेवा सुरू होत आहे.  एनएमएमटीने परिवहन विभाग आणि पनवेल नगरपरिषदेला याबाबतचे पत्र दिले आहे. शुक्रवारी पनवेल रेल्वेस्थानक ते साईनगर या एकाच मार्गावर दर वीस मिनिटांनी एनएमएमटीची ही ७५ क्रमांकाची बस धावेल. या सेवेअंतर्गत सामान्य प्रवाशांना किमान सात आणि कमाल तेरा रुपयांत पनवेलमधून रेल्वेस्थानक गाठता येईल. यासाठी मिनी बस चालविण्यात येणार असल्याने पनवेलमधील अरुंद रस्त्यांवरून ही बस सहज मार्गक्रमण करू शकेल.
पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, सहायक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी ऑगस्टमध्ये घेतलेल्या बैठकीत कफच्या प्रतिनिधींसह प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, वाहतूक विभागाचे बाळासाहेब गाडे, एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड, पनवेल नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते. पनवेल नगरपरिषेदेने नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिल्यानंतर बससेवा सुरू करू, असे आश्वासन व्यवस्थापक आरदवाड यांनी या बैठकीत दिल्यामुळे नगरपरिषदेमध्ये याबाबत जोरदार हालचाली सुरू झाल्या. सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने या प्रस्तावास मंजुरी दिल्याने या बसचा मार्ग मोकळा झाला. मीटर न टाकणाऱ्या रिक्षाचालकांवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांना या सेवेमुळे किफायतशीर पर्याय उपलब्ध झाला आहे.

* पनवेल शहरातील नगरपरिषदमार्गे साईनगर ते रेल्वेस्थानक या ४.७ किलोमीटरच्या टप्प्यात सेवा.
* प्रत्येक वीस मिनिटांनंतर बस धावणार.
* किमान सात व कमाल तेरा रुपये तिकीट.
* सकाळच्या व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत अधिकाधिक बस सोडणे विचाराधीन.
* ही बस पनवेल रेल्वेस्थानकापासून एसटी डेपो, गार्डन हॉटेल, स्वामी नित्यानंद मार्ग, पनवेल नगरपरिषद, काळण समाज सभागृह, नवीन तहसीलदार कचेरी, साईनगर असा प्रवास करेल. बसचा परतीचा मार्गही असाच असेल.
* या सेवेचा प्रतिसाद पाहून पनवेल रेल्वेस्थानक ते उरण नाका या टप्प्यात बस चालविण्याचा विचार.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nmmt bus service in cheapest fare

Next Story
उरणमध्ये कामगारांचा मोर्चा
ताज्या बातम्या